ती
एकदा रस्त्याने फिरता फिरता
ती मला भेटली,
मला म्हणाली,
काय, ओळखलं का मला ?
मी म्हटलं, नाही
अहो, खरंच नाही ओळखल का?
मी म्हटलं, नाही
मी तर नेहमीच तुमच्या सोबत असते
सदैव तुमच्या ह्दयात जागणारी
तुमच्या मनातलं ओळखणारी
मनातलं ओठांवर आणणारी
शब्दांला शब्द जोडणारी
शब्दांला नवा अर्थ लावणारी
भावनांना जागवणारी
सुखात हसवणारी
दुःखाला लपवणारी
यशाकडे कटाक्षाने पहाणारी
अहो, मी कविता,
निघाली आहे,
नवे शब्द शोधत,
शब्दांच्या विश्वात,
तुमच्या सोबत.
.........................................
"शब्दांनो जागे व्हा"
शब्दांचा वार मी
झेलण्याच ठरवलंय
मी माझ्या शब्दांना
पेटून उठायला सांगितलंय
राजकीय सभेच्या खोट्या
शब्दात आहे धार
गरीबांच्या जगण्याला
नाही कुठला आधार
होईल जेव्हा शब्दांचा गजर
तेव्हाच होईल खरा देशाचा
विकासाचा जागर
अजून किती दिवस झिजायचं
किती शांत बसायचं
आता नाही कोणाला घाबरायचं
लोकशाहीच्या मारेक-यांशी
आता थेट भांडायचं
तेव्हा......!
ढाल असेल लेखणीची
ताकद असेल शब्दांची
........................................
"पहिली कविता"
मी एकदा असाच निवांत बसलो होतो
ती माझ्या ह्दयात बसली
ह्दयातलं कागदावर लिहीलं
जसा विचार येत गेला मनाला
एक-एक शब्द सुचतं गेला ह्दयाला
मी ही शब्दांला शब्द जोडला
अर्थमधून अर्थ निघत गेला
अर्थ आणि शब्दांची गंमत झाली
बघतो तर काय तेव्हा माझी
"पहिली कविता" तयार झाली
....................................................
''शब्द"
तुम्ही लावा.......!
माझ्या शब्दांचा अर्थ कसाही
पण मी तिथेच उभा राहिल,
शब्दांचे हत्यार खाली ठेऊन,
कृष्णाची वाट बघतं,
ठामपणे,
न घाबरता,
न डगमगता,
अर्जुना सारखा,
युध्दासाठी.......!
पण तरीही
शब्दांच्या युद्धात
हत्यार कशाला,
फक्त अर्थ महत्त्वाचा आहे,
शब्दांचा अर्थ शेवटी समजून घेणा-यावर आहे,
हसणा-यांच काय हो........!
ते तर मुक्या, बही-यांवर पण हसतात,
शब्दांचा अर्थ बदलून फक्त
मनोरंजन निर्माण करतात,
पण शेवटी
विचार चांगले पाहीजे,
शब्दांचे अर्थही शुध्द होतात.
..................................................
"प्रिय पाऊस"
पाऊस तु येतो
ढगांतून
अश्रुतून
ह्दयातून
भावनांतून
पाऊस लपून बसतो
ढगात
धुक्यात
प्रेमाच्या स्पर्शात
ह्दयाच्या कप्प्यात
पाऊस तु आठवतो
पहिल्या सरीत
दाटून आलेल्या ढगात
पहिल्या प्रेमात
अश्रुंच्या धारेत
-विलास खैरनार
--------------------------------------------------------------------
"रानभिज"
नभात इंद्रधनुष्यात
रंगाने नटलेला,
मेघ गर्जनेच्या
नादात गजबजलेला,
निळ्या नभाच्या
आत दडलेला,
विजेच्या प्रकाशात
खाली डोकावणारा,
रिमझीम रिमझीम
सरसरणा-या सरीतून,
खळखळ खळखळ
वाहणा-या झ-यातून,
रानातल्या भिजलेल्या
पाखरांना सोबतीला घेऊन,
हिरव्यागार रानातून
बंदिस्त डोंगरांच्या धुक्यातून,
गगनातून बरसत
धरणीत विलीन होतं,
जनाच्या ह्दयात
हर्ष दरवळत,
तोच "मी पाऊस"
जो सागरात जाऊन
समरस होतो,
परत तयार असतो
नभात जाण्यासाठी,
पाऊस बनून येण्यासाठी.
...............................................
"पाऊस"
पाऊस....
डोंगराच्या कुशीतून,कडेतून,
धबधब्याच्या रुपात पायथ्याशी येणारा,
नदी, नाल्यातून खळखळून वाहणारा,
तलाव, धरणाच्या साठ्यात तृप्त होऊन
शांतपणे माझ्या कडे पाहणारा,
पण पावसा.....!
सध्या तु कुठेच दिसत नाही,
डोंगरद-या, नदी नाले,
कुठे, कुठेच नाही,
आठवतं का तुला.....?
तु एकदा आला होतास,
केदारनाथाच्या दर्शनाला,
आणि कोशी नदीच्यापात्रात खेळायला,
तु आलास, तेही उग्र रूपात,
सारं जनजीवन विस्कळीत करून गेला,
असा कसा रे तु........!
कधी येतो, कधी येत नाही,
आला तर सर्व उद्ध्वस्त करून जातो,
नाही आला तर उजाड करून जातो,
कधी कधी.....
फक्त एकदा भेट देऊन गायब होतोस,
शेतकरी राजाच्या जीवाला घोर लावून जातोस,
"ये रे ये रे पावसा, तुला देतो पैसा,"
"पैसा झाला खोटा, पाऊस आला मोठा,"
मी असं कधीच नाही म्हणणार,
अरे....!
आमच्या कडेच काही नाही तुला काय देणार,
पावसा.....!
तुझी नेमकी वेळ सांगून जा,
गारपीठ म्हणून नाही,
किंवा अवकाळी म्हणून नाही,
आता फक्त "पाऊस" म्हणून येऊन जा.
....................................................
"आठवणींचा पाऊस"
पाऊसा तु असा कसा,
नेहमीच नवीन रुप घेतो,
ह्दयाचे ठोके चुकवून,
काळजात उद्रेक करतो,
कधी......!
अश्रुंच्या धारेवरुन,
अंतर्मनात तांडव करतो,
पण पाऊसा.......!
तु कसा ही असला,
तरी तु नेहमीच
आठवणीत राहतो.
..........................................
सांग मना...
सांग मना तुच आता
विसरू कसा त्या पावसाला
त्या चिंब भिजून आलेल्या मनाला....
सांग मना तुच आता
कस विसरू त्या पहिल्या भेटीला
सोबत असलेल्या सरीला
दाटून आलेल्या नभाला
कसा विसरू त्या पावसाला
सांग मना तुच आता
कस साठवून ठेवू
त्या मातीच्या सुगंधाला
कसा विसरू त्या प्रेमाच्या गंधाला
सांग मना तुच आता
कस सांभाळू या
हळव्या मनाला
त्या सोबत उंच
उडणा-या पाखराला
कसा विसरू त्या प्रेमाने
गाणा-या गाण्याला
गाण्यासोबत डोलणा-या
त्या तुझ्या नजरेला
सांग मना तुच
कसा विसरू त्या पावसाला
सोबत त्या माझ्या सखीला
आठवणींनी साठवलेल्या क्षणाला
.................................................
"दवबिंदू"
थंडीची चाहूल सोबत,
धुक्याची शाल पांघरत,
शांत निर्भय आकाशात,
सकाळ-सकाळी रंग उधळत,
गवताशी प्रित जुळवत,
पानावरती हक्क गाजवत,
सूर्य किरणांत तेज दर्शवत,
पारिजातकाचा सुगंध दरवळी,
सांज सकाळी खुळ्या आभाळी,
दवबिंदू पानावरी,
रूप त्याचे मोत्यापरी,
रूप त्याचे मोत्यापरी,
...................................
राजे.....
लाठ्या काठ्या काढणारी
जात नाही आमची
आम्ही सरळ तलवार काढतो
आमच्या राजाच्या विरोधात
बोलणा-यानो जरा सावध
आम्ही सरळ छातीतच वार करतो
गद्दारानो तुम्ही संयम
आमचा बघितला
पण वेळ लागत नाही आम्हाला
कोणाला पाणी पाजायला
तुमचे झेंडे मिरवत बसण्यापेक्षा
वेळ काढून जरा
मराठ्यांचा इतिहास वाचून बघा
दिसतील तिथे सर्व वाघ
जरा राजनीती
बाहेर ही डोकावून बघा
शिव छत्रपतींचा
जरा अभ्यास करून घ्या
"पर स्त्री माते समान"
हा अध्याय जरा वाचून घ्या
..................................
"जाणता राजा"
उद्ध्वस्त राष्ट्राच्या कालखंडात,
मराठी माणसांवर अन्याय होतं होता,
मराठ्यांच्या आया - बहीणींच्या
इज्जतीचा कचरा झाला होता,
सामान्य पुर्ण असामान्य झाला होता,
पुर्ण महाराष्ट्र अश्रू ढाळतं होता,
सह्याद्री फक्त पहात बसला होता,
अशा वेळी.......!
महाराष्ट्र दुमदुमला,
सह्याद्रीच्या रांगा कडाडल्या,
१९ फेब्रुवारी इ.स.१६३० रोजी
शिवनेरीवरून एक आवाज निघाला,
"उठा मराठ्यांनो, जागे व्हा"
पुर्ण महाराष्ट्र त्यांनी जागा केला,
तोरणा आणि कोंढाण्यावर
भगवा फडकु लागला,
प्रतापगडावर अफजल
सैतानाचा वध केला,
त्यांच्यासाठीच.......!
पावनखिंडीत बाजी प्रभूंनी
हरहर महादेवचा जयघोष केला,
एका-एका सैतानाचा नाश करून
त्यांनी पुर्ण महाराष्ट्र सोन्याचा केला,
खरंच.......!
त्यांच्या डोक्यावर भवानी मातेचा हात होता,
हातात भवानी मातेची तलवार होती,
काळजात राष्ट्रहिताची मशाल होती,
ते आमचे भाग्यविधाता होते,
ते जिजाऊ मातेचे महान रत्न होते,
तेच आमचे "जाणता राजा " शिवाजी राजे होते.
..............................................................
"महाराष्ट्र"
महाराष्ट्र माझा म्हणतांना
माझे मन भारावून जाते,
महाराष्ट्राच्या बहरलेल्या
अस्मितेला बघून छाती
अशी फुलून जाते,
गगनाला लाजवून टाकी
सह्याद्रीच्या रांगा
पराक्रमीच्या गाथा सांगती
तलवारींच्या धारा
एकशे पाच हुतात्म्यांना
सलाम करतो
खान्देश, विदर्भ, मराठवाडा
ऐक्याचे प्रतिक दाखवतो,
किल्लावरच्या तोफा गर्जवितो
महाराष्ट्राची शान राखतो
गडकिल्यांच्या मातीत रंगतो
इतिहासाच्या पानात भिजतो
मर्द मावळ्याच्या रक्तात भिडतो
झेंडा भगवा ह्दयात फडकतो
शिवरायांशी ईमान राखतो
तोच मावळा महाराष्ट्र घडवितो
महाराष्ट्रावर असेल सदैव
सह्याद्रीची छाया
असा माझा महाराष्ट्र देशा
झुकवी दिल्लीची काया
........................................
"अनेकदा मी ठरवतो"
अनेकदा मी ठरवतो
आता सर्व काही विसरायचं
जपून आठवणी फक्त
पुढे चालायचं
अनेकदा मी ठरवतो
दुःखाच्या काही आठवणी
सुखाच्या पारड्यात टाकायचे
जीवनाच्या प्रवासात
नवे सोबती घ्यायचे
अनेकदा मी ठरवतो
जीवनाच्या संध्याकाळपर्यंत
आपुलकीची लोकं शोधून काढायची
नव्याने परत सकाळ त्याचं
लोकांसोबत जगायची
अनेकदा मी ठरवतो
जीवन अस की त्यात
काही नवं पाहीजे
उगीच तेच तेच
उसण जगणं नको पाहीजे
..................................................
"राजनीती"
माझ्या माणूसकीचा
दरवेळी करतो मी घात,
तरी उभा आहे ताट मानेत,
स्वतःचा स्वाभिमान बाजूला ठेवत,
फिरतो आहे त्यांच्या मागे
भारत मातेला लाजवत,
शहीदानांची अवहेलना करत,
आजच्या भ्रष्टाना साथ देत,
स्वतःला पुढारीत,
माझ्या हातात त्यांचे झेंडे घेत,
ताकदीने उभे असलेल्या
देशाला खोट्या आश्वासनानी हिणवत,
निघतो मी गल्ली बोळात,
आवाज देत,
घोषणाचा.......!
खोट्या शब्दांचा......!
दडपशाहीला कवटाळत,
करतो लोकशाहीचा अंत,
माणूसकीला गहान ठेवत,
फक्त......!
सत्तेसाठी
............................................
"जखम"
जेव्हा
पेटून उठता
वेदना
माझ्या
जखमेवर
तेव्हा
वेदनांच्या
आकांतात
रक्त येतं
जखमेवर
पण
शेवटी
इतिहास
लिहिला जातो
त्या जखमेवर
नंतर कुठे
विचार केला
जातो
त्या वेदनांवर
त्या रक्तावर
......................................
"स्वप्न"
करशील पाठलाग स्वप्नांचा
रात्रीच्या चांदण्यात
जिद्दीने देशील प्रकाश
स्वप्नांना अंधा-यात
सक्षम मार्ग शोधत
घेऊन मशाल त्यागाची
हातात ढाल
घेत कर्तव्याची
स्वप्नांच्या प्रकाशाला
भीती ही अंधकाराची
उभा रहा मनी बाळगत
संकल्पना ही ध्यासाची
स्वप्नांसाठी झिजता
वादळ उठू दे कष्टाचे
रक्ताळलेल्या घामामध्ये
मर्म उमलू दे कर्माचे
.................................
"जात-धर्म"
फाळणीच्या वेळी
देशावरच घात झाला,
कोणी ईश्वराचा झाला,
कोणी अल्लाचा झाला,
नंतर.....!
धर्माच्या नावाखाली संपूर्ण देश जाळला,
भर रस्त्यावर राम रहीम लढतांना पाहिला,
जिथे काल एकोप्याने रहात होते,
तिथेच आज दंगली झाल्या,
अहिंसाचा संदेश देणा-या
गांधी चौकात खुले आम कत्तली झाल्या,
विषय नितीमत्तेचा आहे,
कोणा धर्माचा नाही,
"हम सब भाई भाई" असं
म्हणण्याचा काळ उरला नाही,
पुढा-यांनी बंधुमधला भाव
आता ठेवला नाही,
तुम्ही सुद्धा बघत होता,
राम मंदिराच्या पायथ्याशी रहीम
मोठ्या आनंदाने खेळत होता,
जात - धर्म माणसाच्या काळजात असली,
तरी जाणीव राजकीय भाषणातून मिळाली,
सत्तेच्या हव्यासा पायी समाजात
जातीची जाळं टाकली,
मातीचा रंग एक
रक्ताचा रंग एक
मग झेंड्याचा रंग वेगळा कसा,
तुच सांग भारत माते,
एकात्मतेचा विषय फक्त
पुस्तकांच्या पानांमध्येच कसा?
...........................................
"व्यथा"
शिक्षणाच्या बाजारात
मी अडकलो आहे,
पुस्तकांच्या ओझ्याखाली
दबलो आहे,
पदवीचे कागद घेऊन
दारोदारी भटकलो आहे,
कुठे आहे का काम ?
याचा शोध पण घेतला आहे,
महत्व नाही बाजारीकरणात
सादरीकरणाला,
हेच समजायला
मला खूपच वेळ लागला आहे,
नेहमीच वाटत होतं मनात,
आकाशातल्या ता-यासारखं
चमकत राहायचं,
पंख लाऊन पक्ष्यांसारखे
उंच उंच आकाशात जायचं,
राजा बनुनी मला,
माझ्याच मनावर राज्य करायचं,
असं,जीवन जगायचं,
स्वप्नांच्या पलीकडचं,
पण काय करणार.........!
अजूनही आहे गरीबीची
झळ काळजात,
मानगुटिवर बसली आहे जात,
सापासारखी विळखा घालत,
आणि मी......
उभा आहे रस्त्याच्या कडेला,
लाल दिव्याच्या गाडीला सलाम करीत,
एका हातात पदवींचे कागद घेऊन,
दुस-या हातात पक्षाचा झेंडा घेऊन,
पक्षाच्या मालकाची वाट पाहत,
भिका-यासारखा घुसमटत,
का....?
कशासाठी......?
राष्ट्राच्या हितासाठी?
का, टिचभर पोटासाठी ?
........................................
"उन्हाळा"
उन्हाच्या चटक्यांनी
पाय भाजतो
घामाच्या धारेने
पाऊसा सारखा भिजतो
का हा उन्हाळा असेल बरं
असे प्रश्न मनाला सतावता
उन्हाच्या झळा उभ्या
रानाला झिजवता
उष्ण तडाका रोजच
नव रूप धारण करतो
रानातल्या पाखरांना
उगीचच छळतो
सायंकाळ झाली कि
थंड वा-याची झुळूक येते
रात्री मग सुखाची
झोप येते
...........................................
समाधान....
मनुष्य कधीच
समाधानी नसतो
तो नेहमी कुठं तरी
समाधान शोधत असतो
पण मानलं तर प्रत्येक
गोष्टीत समाधान असतं
नाही तर कुठेच समाधान नसतं
आधी आपला आनंद कशात
आहे हा शोधला पाहीजे
उगीच कुठेही भरकटलेला नको पाहीजे
जो मनुष्य भरकटला तो
कधीच समाधानी राहू शकत नाही
जो समाधानीआहे त्याचा आनंद
कोणीच हिरावू शकत नाही
.................................................
"शोधतोय"
मन माझे गगनापरी जातंय
वरून खाली बघतंय
सैरभैर होतंय
कुठं काय शोधतंय
उगीचच कुठं तरी फिरतंय
जुन्या आठवणीत रमतंय
मनात काहीतरी खदखद वाटतेय
का कोणाचं ठाऊक काहीतरी शोधतंय
पण....
काही तरी मागे ही राहून गेलंय
....................................................
"गप्पा"
गप्पा रंगल्या की
माणसं हरवून जाता
जुन्या गोष्टीं
उगीचच रंगवत बसता
गप्पा कशाही असल्या तरी
त्या फक्त भुतकाळ सांगता
भविष्याचा तर्क लावत
वर्तमान चिटकवत बसता
गप्पा सुध्दा माणसाचं
व्यक्तीमत्वा सोबत वय दर्शवता
काही तर फक्त चारचौघांत
गप्पा मारून हुशारी दाखवत बसता
गप्पा मारणं चुकीचं नाही
पण त्याला सुद्धा मर्यादा असता
काही तर म्हणे फक्त
"काम सोडून खांबच रगडता"
गप्पा या मनोरंजनासाठी करता
की एखाद्या व्यक्तीची निंदा करता
केव्हा काही चांगल्या कामासाठी करता
हे त्या गप्पाच्या विषयावर सोडता
गप्पा त्या शेवटी गप्पाच असता
...............................................................
आठवणी....
आठवणी अथांग
सागरासारख्या असता
आठवणी रडवता
आठवणी हसवता
आठवणी सुखाच्या असता
आठवणी दुखःच्या असता
आठवणी मायेच्या असता
आठवणी ममतेच्या असता
आठवणी गोड असता
आठवणी तिखट असता
आठवणी आपल्या
माणसांच्या असता
आठवणी परक्या
माणसांच्या असता
आठवणी सदैव
सोबत असता
आठवणी नेहमीच
आठवणीत राहता
.........................................
"विश्व"
आपल्याच विश्वात
रमून राहणं
शांततेत स्वतःच
स्वतःला शोधत बसणं
त्यात नवं
काही नसतं
फक्त स्वतःला
सिद्ध करणं असतं
.........................................
"शेतकरी राजा"
जगाचा पोशिंदा
राजा शेतकरी
जेव्हा करी ती कष्ट
तेव्हा मिळते
पोटाला भाकरी
तो उभ्या उन्हात
जळतो
धरतीतून सोनं
पिकवतो
नाही भीती त्याला
ऊन, वा-याची
धरती त्याची
आई त्याला
परवा कशाची
नमन देवा तुला
सदा सर्वदा
सुखी ठेव माझा
जगाचा पोशिंदा
................................
"जात"
असेल अधिकार तुम्हाला
तुमची जात मांडण्याचा
जरा आमच्या ही जातीचा
इतिहास वाचून या....
भांडायचं असेल जातीवर
तर पुन्हा एकदा संविधान वाचून या....
................................................
"ओंजळ भरली सुखांनी"
ओंजळ भरली सुखांनी
जीवनाच्या प्रवासात
ओंजळ अशी की
असावी सदैव सहवासात
प्रत्येक क्षण
असावा आनंदाचा
दुखःला पण
लाजवण्याचा
........................................................
"सांत्वन"
आपण चालत असतो,
जीवनाच्या मार्गांवर,
कधीतरी जातो,
दुःखाच्या उंबरठ्यावर,
उसळलेल्या वेदनांत,
मनावर पडलेल्या
घावांचा उद्रेक करत,
अश्रुंच्या सहवासात,
शोधत असतो,
आपल्या माणसात,
आपलंपण,
तेव्हा.....!
भावनांचा कल्लोळ उठवत
संवेदनांचा आक्रोश करत,
दुःखाच्या वेदना भोगत,
करतो याचना, यातनांची,
पण......!
समोरचा करतो फक्त,
आपलं सांत्वन,
हळव्या मानने,
दबक्या आवाजात.
...................................
"ध्येय"
जीवनाच्या ध्येयाकडे पहात,
नवचैतन्य निर्माण करत,
जगावस वाटतंय,
कोणीच नाही गेले अशा
वाटेणं जावसं वाटतंय,
उजेडासाठी सोबत
पुस्तकांची मशाल घेत
अज्ञानाच्या दरीतून
ज्ञानाची पायवाट शोधत,
एखाद्या त्यागी पुरुषासारखा
ज्ञानाचा शोध घेत,
अंधारातून प्रकाशाकडे जातं
सुकलेल्या मनाला
आशेचा पाझर देत,
कल्पनांच्या जगात
संकल्पनांचा ध्यास घेत,
दुःखाच्या यातना भोगत,
सुखांकडे कटाक्षाने बघत,
ध्येय साध्य करण्यासाठी
स्वप्नांचा डोलारा उंचवत,
जातो आहे मी,
पुस्तकांच्या दुनियेत,
ज्ञानाची ओंजळ भरत,
गाठतो आहे शिखर प्रगतीचे,
ध्येयासाठी.......!
.........................................
"माणूस म्हणून जगताना"
माणूस म्हणून जगताना
सर्वांना सोबत न्यावं लागतं
माणूसकीच्या गोतावळ्यात
नातं टिकवाव लागतं
बंधनांच्या विळख्यात
आपुलकीच घरट बांधत
माणूसपण जगाव लागतं
माणूसकी सोडून जगणं सोपं असतं
माणूस म्हणून जगणं कठीण असतं
अंतर्मनात दडलेल्या नात्यांना
प्रेमाची फुंकर मारत
ह्दयातील स्पंदनाना जागवावं लागतं
तेव्हाच माणूस म्हणून जगता येतं
………………………………………………………………
माणुसकीचे वारे...
माणुसकीचे वारे
सध्या कुठंच दिसत नाही
मोसमी पावसासारखे ते
कुठेच वाहत नाही
बंधनात गुंफून ठेवलेली नाती
तुटून जाताना दिसताय
वा-यासारखे वाहत ते
गगनात जाताय
माणूस माणसापासूनच
दूर जातोय
ह्दयात दडलेल्या शब्दांना
उगीच फसवतोय
वारे कसे ही असो, ते आपल्या
संगतीत वाहणारे पाहीजे
बंधनांत अडकून
ह्दयात साठवणारे पाहीजे
………………………………………………………….
"सवंगडी"
जुन्या आठवणींना सांघळ घालत
आठवणींना उजाळा देत
जगतो आम्ही गंमतीने भूतकाळात
बालपणाच्या उंबरठ्यावरूण
सवंगडीत बहरण
लगोटी यार असणं म्हणजे
जाणू बालपणात रमण
क्रिकेट, गोट्या गोट्या,
कधी कधी इटी दाडू खेळणं
खेळता खेळता आमचं गांवभर फिरणं
गावाच्या गल्लीबोळातून हिडण
एका दिवसा आड एक भांडण करण
घरी येऊन परत बापाचा मार खाणं
दिवसा कोणाच्या शेतात काय बघून येणं
रात्री त्याच शेतात जाऊन पोट भरसतव खाणं
दुस-या दिवशी त्या शेतक-याचा
गावात आरडाओरड बघणं
शाळेत प्रिय व्यक्तीच्या सहवासात सतत रहाणं
रात्रभर जागून जागून अभ्यास करणं
प्रिय व्यक्तीवर उगीचच शाहीनिग मारण
शाळेत कधीच जेवणाचा डबा घेऊन न जाणं
मध्यला सुट्टीत तिच्या डब्यात जेवन करणं
गावाच्या ब्लेक लिस्टमध्ये प्रथम असणं
पण शिक्षकांचा आमच्या पाठीवर
शाब्बासकीचा हात असणं
असंच गंमतीशीर आमचं बालपण
तारूण्यात मात्र शिकवत शहाणपण
................................................
"भूतकाळ"
तुला विसरता
येत नाही
तुला सोबत नेता
येत नाही
चांगल वाईट सर्व
सोडून पुढे जावं लागतं
तु दाखवलेल्या स्वप्नात
रमून जावं लागतं
तु नसला तर
वर्तमान सुचतं नाही
भविष्याचा वेध
घेता येत नाही
तु कसाही असला
तरी तु जीवनाचा
एक भाग बनत जातो
तुझ्याच आठवणींचा
वर्तमान आनंद घेत असतो
- विलास खैरनार
...................................................
"पहिली भेट"
तुला वाटत असेल मी बदललो
पण मी आहे, तसाच आहे
अगदी पहिल्या सारखा
आणि मी तसाच राहील तुझ्यासाठी
तु विसरली असतील
"साता जन्माच्या गोष्टी"
मी नाही ना विसरलो
आठवत असेल तुला ही
ती आपली पहिली भेट
तो तुझा निरागस चेहरा
अजून आहे माझ्या डोळ्यासमोर
नकार देता देता , होकार देणं
आठवत असेल तुला ही
तुझं ते रडणं, रडून मला रागवण
अजून बरंच काही.....
..................................................
"कळला नाही तुला अर्थ"
कळला नाही तुला अर्थ
माझ्या प्रेमाचा
ह्दयात भिडलेल्या शब्दांचा
अर्थ माझा रूसण्याचा
कवितेत माझ्या शोधू
नको अर्थ शब्दांचे
ह्दयात स्पंदन
होतील अर्थाचे
निरखून बघ प्रेम
माझ्या कवितेत
नकळत दिसेल तुला
तुझे रुप प्रतिबिंबेत
अश्रू दिसतील तुला
शब्दांच्या अंतरंगात
शब्द घेऊन येतील
सौंदर्य शब्दांच्या रुपात
कळला नाही तुला अर्थ
माझ्या कवितेचा
का कस झालं प्रेम आपलं व्यर्थ
कुठं कमी पडलं माझं यथार्थ
देऊ नाही शकली तु सामर्थ्य
सांग तुच कसा झाला
आपल्या प्रेमाचा अनर्थ
....................................................
"सावरून घे"
सावरून घे स्वतःला
समजून सांग मनाला
सदैव असेल तुझ्याच संगतीला
जाणून घे भास असण्याचा
रात्रीच्या चांदण्यात
पौर्णिमेच्या उजेडात
आमावस्येच्या अंधारात
आनंद घे मी असण्याचा
नाचून घे अंगणात
बागडून घे रानात
भिजून घे पावसात
आभास कर मी असण्याचा
ह्दयाच्या श्वासात
हाताच्या स्पर्शात
काळजाच्या ठोक्यात
स्वप्नात निश्चय कर भेटण्याचा
...........................................
"प्रेम वेडा"
तिला न्याहाळत न्याहाळत
मी केव्हा तिच्यात एकरूप झालो
हेच मला समजलं नाही
तिच्या सौंदर्याला पहात
मी केव्हा तिचा झालो
हेच मला समजलं नाही
तिच्या ओठांवरच्या शब्दांना वेचत
मी केव्हा शब्दानं मध्ये गुंतलो
हेच मला समजलं नाही
तिच्या केसांच्या गज-याला बघतं
मी केव्हा गज-यात गुरफटलो
हेच मला समजलं नाही
तिच्या श्वासात श्वास घेत
मी केव्हा तिचा श्वास झालो
हेच मला समजलं नाही
मी स्वतःला शोधतो आहे तिच्यात
मी केव्हा तिच्यात हरवलो
हेच मला समजलं नाही
...........................................
"सौदा"
तुझा प्रत्येक शब्द
काळजापर्यंत भिडला
तिथे सजवलेल्या
स्वप्नांना उजाळा देत गेला
का दूरावा झाला ?
आपल्यात समजेल का मला
अग प्रेमच सोड
जरा भावनाचा
तर विचार करायचा होता
प्रेमात होत नसतो
कधी सौदा कसला
तु सौदा माझ्या
भावनाचा केला होता
......................................
"बाहेर पाऊस कोसळतोय"
बाहेर पाऊस कोसळतोय....
मी तिला काळजात शोधतोय
ती पावसात भिजतेय
मी तिला डोळ्यात सामावतोय
ती आकाशाकडे बघतेय
मी तिला सोबत नेतोय
ती पावसा सोबत नाचतेय
मी तिला जवळ बोलवतोय
ती दूर जातेय
कारण....
मीच पाऊस बनलोय
ती सरी बनलीय
तरी मी तिला सांगतोय
बाहेर पाऊस कोसळतोय
बाहेर पाऊस कोसळतोय
.............................................
मन"
मन तिचं माझं झालं
श्वास मी तिचा झालो
मन आणि श्वास घेऊन
एकमेकांत गुंतलो
केली आहे मनाने तयारी
तु माझी होणार नाही
मान्य केलं आहे श्वासाने
तु माझ्या शिवाय राहणार नाही
.........................................
"काही उपयोग नाही"
काही उपयोग नाही
तुझा असं वागण्याचा
रेशमाचे बंध प्रिये
अधिकार नाही तुला तोडण्याचा
जपून ठेवलं प्रेम सारं
उगीच का छळते
दूर दूर जाऊन
का मला जाळते
का मागते आहेस
आपल्या प्रेमाचा पुरावा
सहन केला खूप
तुझा माझा दुरावा
काही उपयोग नाही
अस दूर जाऊन
परत ये माघारी
जगाला दे आपलं प्रेम दाखवून
............................................
"तुटलेलं मन"
दूर जा नजरेतून
जात आहे तुला सोडून,
विसरून जा सर्व काही
प्रेमाला मात्र विसरून नको,
झुकू नको कोणा समोर
प्रेम सिद्ध करण्यासाठी,
आहे सख्या तुझीच मी
तु मला विसरू नको,
सावरून घे स्वतःला
तुच असशील ह्दयात माझ्या
विश्वास आपल्या प्रेमावर असू दे
मी होते आहे दुस-याची
आश्वासन कसलं मागू नको,
.................................................
"अदृश्य"
माझ्या गुन्ह्याची सजा
मला मान्य आहे
तु दिलेल्या वेदनांचा
घाव अजून तसाच आहे
नको लोटू दूर अस वेदनांसोबत
जरा घाव तर भरू दे
सजा असो कोणतीही
जरा गुन्हा तर सिद्ध होऊ दे
शब्दांला शब्द जुळवत बसतो
प्रेमाला आठवत
शब्दांना जागवत असतो
आठवणींना साठवत
सर्व बंधने तोडून करेल
तयार आपल्यासाठी नवं दृश्य
जरा आवाज तर देऊन बघ
असेल मी सदैव तुझ्याच सोबत
अदृश्य.....
....................................
"फक्त तु"
तुझ्यासोबत जगण्याचं
राहील फक्त स्वप्नंच
तु दिसावं चांदण्यात
मी असावं ता-यात
तुला मी रोज स्वप्नात बघावं
तु रोज माझ्याकडे बघून हसावं
प्रेमाचा खेळ असा चालावा
तो रोज आपणच खेळावा
फुले, चंद्र, तारे रोज मी आणून द्यावे
ह्दयात माझ्या तुला राणी बनून ठेवावे
..........................................................
"पहिल प्रेम"
सांगू कोणाला दुःख माझं, वेदनां आहेत वेगळ्या
व्यक्त होता येत नाही, दडवून ठेवल्या भावना सगळ्या
घाव हा काळजावरचा कसा दाखवू तुला
काय असा गुन्हा केला, सांगशील का मला
सोडून गेलीस तु मधेच रस्त्याला
विचारून बघ त्या ह्दयाला,
असेल नाव माझं तुझ्या प्रत्येक श्वासाला
विसरणार नाही तुला, अस सांगत होतीस
असा हा प्रेमाचा खेळ खेळून गेलीस
जखम प्रेमाची सोडून गेलीस
कोण आता समजवेल भोळ्या जीवाला
तुझ्या जीवाला जीव दिला, तुच सोडून गेलीस मला
तुच माझ्या स्वप्नांचा राजकुमार, अशा थापा मारत होतीस
जाता जाता, मी तुझी कोणीच नाही, अस सांगून गेलीस
उठता, बसता, झोपता सतत तुझाच विचार असतो मनात
हे आता समजलं मला, वेडा कसा होतो माणूस प्रेमात
दगा दिलास तु माझ्या प्रेमाला, समजवू कसा माझ्या मनाला
नको भेटू तु पुन्हा, हीच विनंती देवाला
आठवण येईल तुला, माझ्या प्रेमाची
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर
देव आहे माझ्या सोबत, कारण खरं प्रेम केल मी तुझ्यावर
केव्हा मी तुझा झालो, आठवतं नाही माझं मला
पहिल प्रेम आहेस तु माझं, विसरणार नाही मी तुला
.......................................................................
"प्रेमाची आठवण"
मनात नव्हतं कुठलं शहाणपण,
पण खूपच भारी होतं बालपण,
ह्दयात आहे, बालपणाची साठवण,
बालपणात आहे, प्रेमाची आठवण,
आठवतं का तुला.......?
शाळेत येता जाताना,
माझं तुझ्या मागे मागे फिरणं,
तुझ्या वर्गापुढे गिरक्या घालणं,
एकत्र खेळ खेळणं,
खेळता खेळता तुला हसवणं,
तुझं ते माझ्याकडे पाहून लाजणं,
तुझं ते मनमोकळे हसणं,
सारं काही मनात घर करुन गेलं,
तेही मन मात्र तुच सोबत नेलं,
नाती गोती सांभाळता सांभाळता,
गेलीस मला सोडून,
प्रेमाला मनात दडपून,
जिव्हाळ्याचा संबंध तोडून,
कुठे आहेस तु.....!
अजून शोधतो आहे तुला......!
मनाच्या गाभा-यात,
प्रेमाच्या अंतरंगात,
भेटशील का तु मला...?
कुठे तरी.......? कधी तरी.......?
कारण.......!
मला विश्वास आहे माझ्या प्रेमावर,
कधीतरी येऊन राज्य करशील माझ्या हृदयावर
.........................................................
"शेवटची भेट"
मी फक्त तिच्या कडे बघत होतो
ती हुंदके देत रडत होती
डोळ्यातलं पाणी पुसत
अखेरच ती मला डोळे
भरून बघत होती
माझा हात तिच्या हातात घेत, जवळ आली
"आता नाही होणार भेट आपली"
अस म्हणतं ती माझ्या मिठीत आली
खांद्यावर डोकं ठेवून ती रडत होती
मी फक्त तिच्या कडे बघत होतो
कारण.....!
शब्द नव्हते माझ्या कडे तिला समजवायला
हिंमत होतं नव्हती तिला सावरायला
मीच माझ्या डोळ्यातून येणा-या
अश्रुंना आवर घालतं होतो
अखेरच तिला डोळे भरून बघत होतो
अखेरच तिला डोळे भरून बघत होतो
............................................................
"प्रेम"
बहरलेल्या ओटीला,
उसळलेल्या लाटाला,
निळ्या नभ्र आकाशाला,
संगतीला घेऊन शांत असलेला
स्वप्नांना उजळा देत,
एकमेकांच्या सहवासात स्वप्न रंगवत,
आमच्या गप्पांना रंगत वाढवत,
आणि.....!
परत मी याच ठिकाणी उभा,
सजवलेल्या स्वप्नांना,
अथांग सागरात बुडवत,
उभा आहे त्याच किणा-याला
उसलेल्या लाटांणा
साक्षीदार करून,
घेऊन आलो आहे,
तुटलेल्या प्रेमाला,
संमर्पण करायला
अखेरच.
........................................
"साथ"
नेहमीच वाटत आता
असावं कोणीतरी जीवाला
जीव देणारं
दुरूनच आपल्याकडे
पाहून गालातल्या
गालात हसणारं
कारण नसताना
आपल्याला चिडवणारं
चिडवून आपल्याकडे
बघून लाजणारं
असावं कोणी नको तेव्हा
सल्ला देणारं
खरंच असावं कोणीतरी
दुनियादारीला घाबरत
लपून छपून साथ देणारं
...................................
"साता जन्माच प्रेम"
"सात जन्म मी तुझीच रे"
अस तुच माझ्या
हातात हात सांगितले,
असेच तुझ्या सहवासात
कितीतरी स्वप्न रंगविले,
तुला ही आठवत असेल,
तो रस्त्याच्या कडेचा दगड
ज्याच्यावर तुझं नाव लिहिलं,
तुझ्या आठवणींत,
तो अगदी तसंच पडलाय,
आपल्या प्रेमाची निशाणी सांभाळत,
हिशोब याचा नाही देत
की किती अश्रुं वाया गेलेत,
याचा देतो की वेदना
किती झाल्यात,
तुझ्या आठवणीत,
दुःख याचं नाही की
तु मला सोडून घेलीस,
दुःख याचं आहे की
तु मला विसरलीस,
काळजात उसळलेल्या
सागराच्या लाटात,
ह्दयात उठलेल्या वादळात,
शोधतोय आठवणींना सोबत घेत ,
माझ्या "साता जन्माच्या प्रेमाला",
.................................................
" फक्त एका भेटीसाठी "
फक्त एका भेटीसाठी, जीव तळमळतो आहे,
उडणार-या पाखरांसारखा, काळजामध्ये झेप घेतो आहे!
रणरणत्या उन्हामध्ये, उभा जीव जळताना,
निघत जातात क्षण सारे, मरत मरत जगताना,
रात्रीच्या ता-यांमध्ये जीवाला विणतो आहे!
फक्त एका भेटीसाठी, जीव तळमळतो आहे!
पडणा-या पावसाच्या सरींवर,आकाशाकडे कोण पहातो?
मीच माझ्या सावलीखाली, आडोसा शोधतो,
सायंकाळच्या सूर्यास्तमध्ये उजेडाला बघतो आहे!
फक्त एका भेटीसाठी, जीव तळमळतो आहे!
चंद्राच्या कुपंनामध्ये, रात्र गुंफली गेली,
बहरलेल्या चांदण्यात, पहाट खुलून गेली,
सूर्योदयाच्या किरणांमध्ये प्रेमाला अजमवतो
फक्त एका भेटीसाठी, जीव तळमळतो आहे!
...............................................................
"माझे स्वप्न"
पण माझ्या स्वप्नांच काय ?
जे तुझ्या खुशीत सजवले
चंद्राच्या साक्षीने
स्वप्न ते नटवले
पण प्रश्न एकच
सतावतो मनी
माझे स्वप्न
का नाही आले तुझ्या ध्यानी ?
……………………………………………………
"दुरावलेल प्रेम"
आठवण तुला नेहमीच येईल
मला सोडून गेल्यावर,
नको शोधू स्वप्नांच्या अंधारात,
मी तिथे नसल्यावर,
ह्दयावर हात ठेवून आवाज दे,
येईन मी तुझ्या काळजाला धडक देत
तु आठवणीत रमलेल्यावर,
नाही भेटलीस पुन्हा मला
विसरून मात्र जाऊ नकोस,
विसरण्याचा प्रयत्न ही करशील कदाचित,
पुन्हा प्रेमाच्या दुनियेत रमू नकोस,
तिच्यावर केलं प्रेम तिनेच मला विसरावे,
रंगवलेले स्वप्नं क्षणात तोडावे,
ह्दयाच्या कप्प्यात साठलेल्या
आठवणींचे क्षणात तुडवावे,
आपल्या तुडलेल्या प्रेमाचा
गुन्हेगार समजेल स्वतःला,
साथ तुझी नसली तरी
आयुष्याभर निभवेल प्रेमाला,
तु माझी नाहीस हे जरी खरं असलं
तरी मी तुझी आठवण काढणार,
माझं प्रेम कधीच नाही संपणार
दररोज देवाजवळ मात्र तुलाच मागणार,
.................................................
"सौंदर्य तुझं"
लावण्यापरी सौंदर्य तुझं,
अप्सरावानी दिसणं तुझं,
रोजच नटून थटून येते,
तुझ्या सौंदर्याची उधळण करते,
रोजच तु खुलून दिसते,
त्याचं निमित्ताने तुझ्या
नव्या रूपाचं दर्शन होते,
तुझ्या सौंदर्याचा
वेगळाच तो गंध,
दरवळतो चहू बाजू सुगंध,
अस वाटतं.....!
तु रोजच शृंगार करून यावं,
तुला फक्त माझ्याच
स्तब्ध नयनांनी बघत राहावं.
.........................................
"शेवटचा श्वास"
दिलेलं वचन पाळतो मी
तुच माझा शेवट आहेस
असेल जरी मी माझा
पण श्वास मात्र तुच आहेस
असेल जरी गुंतलो कुठं मी
ध्येय मात्र तुच आहेस
तुझ्या आठवणींची
गुंफली जरी माळ मी
पण माळेचा धागा तुच आहेस
तुझ्या सहवासात गुंतलेलेे क्षण
कुठे साठवून ठेवले आहेस
तुझ्या सहवासात
नवी पहाट उगवली
पण सकाळीचा पहार तुच आहेस
स्वतः ला केले आहे समर्पित
तुझ्या स्वप्नांच्या दुनियेत
गुंतलो आहे तुझ्या मी प्रत्येक श्वासात
असेल माझा शेवटा श्वास
तुझ्या शेवटच्या श्वासात
.....................................................
विरह
मी अजून तिथेच आहे
जिथे तु सोडून गेलीस
ह्दयाच्या ठोक्यांना हुदंके देत,
भावनांच्या छटा रंगवत,
आठवणींना मनांच्या
हुंदक्यांना हिंदोळे देत,
प्रेमाच्या स्पर्शाने
आपुलकीची सांगड घालत,
पहातो आहे वाट तुझी
आयुष्याच्या नव्या वळणावर
तिथेच, जिथे तु सोडून गेलीस,
---------------------------------------------------------------------
"बाप होणं"
बायकोची "गोड बातमी" ऐकून डोळ्यात आनंदाश्रू येतात
तेव्हा पुरूषामधला बाप जागा करून जातात
दवाखान्यात नाजुकसा जीव जेव्हा जन्माला येतो
चिमुरड्या जीवाच्या जबाबदारीने मनात आनंद बहरून जातो
मग सुरु होतं नवीन जगणं.....!
बायकोबरोबर जागून रात्री डायपर बदलणं
पिल्लाला कडेवर घेऊन उगीचच फेऱ्या मारणं
मित्रांबरोबरच्या पार्ट्याना फक्त हजेरी लावणं
संध्याकाळी पावलांना घराची ओढ लागणं
पिल्लाचा नाजुक हात,पाय झोपेत अंगाखाली येऊ नये म्हणून रात्रभर सावध झोपणं
पिल्लाबरोबर खोट्या फाइटिंग खेळून गडबडा लोळणं
दिवसभर मोटरसायकलवर फिरून
सायंकाळी पिल्लाच्या सायकलच सीट पकडून सायकल
मागे धावणं
घरात येऊन त्याच्या सोबत गाडींचा खेळ खेळणं
त्याच ते पप्पा पप्पा शब्दाचे बोल कानात भुणभुण
खरंच किती छान असत ना हे बाप होणं
………………………………………………………………….
बुजगावणं.....
कोरोना देवाच्या कृपेने लाॅकडाऊनचा काळ आला
याच काळात मात्र माझ्या बायकोचा निराळाच खेळ जमला
मी म्हणतो बायकोला शांत घरात बसू
ती म्हणते कशी....!
नुसतं कस बसू ? आता रोज जोडीने फरसी पुसू
मी स्वयंपाकात काय बनवलं विचारांयच नाही
कोण केव्हा काय खाईल कोणाला काही बोलायचं नाही
लाॅक डाऊन काळात माझ्याकडे
स्वयंपाक घराच काम आलं
बायकोच्या प्रत्येक नख-याच शांततेत मात्र दर्शन झालं
लक्ष्मी, सरस्वतीचे दर्शन आधी मी तर रोजच घेत होतो
लाॅक डाऊनमुळे दुर्गा, चंडी, भवानीचे रूप
मी केविलवाणी बायकोत बघत होतो
नखरे असता ते छत्तिस, या म्हणीत काहीच नाही खोटं
शृंगार असावा बायकोचा त्यापुढे कोणीच नाही मोठं
क्लोजफ स्माईल, बेस्ट पिक्चर,कपल चॅलेंज झाला
फिर मुस्कुरायेगा इंडिया झाला
आता कुठे नथीचा नखरा आला
अशी ही चॅलेंज, नख-याची बरसात झाली
लाॅक डाऊन काळात मला माझ्याकडे बघून
बुजगावण्याची आठवण झाली....
................................................
No comments:
Post a Comment