Showing posts with label कविता. Show all posts
Showing posts with label कविता. Show all posts

Sunday, December 1, 2024

मतदान


सर्वत्र शुकशुकाट होता
कारण...
एक एक वोट फक्त
एका बाटलीत
विकला जात होता

विकासाचे तेच तेच
धडे मिरवत
लोकशाहीला
हिणवत होता

गल्ली गल्लीत
भंडारा होता
तिथे आलेला
गल्लीतला पोरगा
मात्र नागडाच होता
- विलास खैरनार

EVM घोटाळा


चारा,स्टॅम्प, 2G,
सिंचन,आदर्श
सर्व घोटाळे बघितले

आज पहिल्यांदा देव इंद्राचा
EVM घोटाळा बघितला
अन् मीच माझ्या डोक्याला हात लावला
अरे हा तर
सर्वच घोटाळे बाजांचा बाप निघाला
सर्व मंत्री मंडळच याने काबिज केला

थोडी तरी लाज वाटू दिली असती
किमान विधानसभेत बोलतांना
तुमची मान खाली गेली नसती

अरे घोटाळ्यांची
कशी ठेवणार तुम्ही मापं
अन्
कुठं फेडणार एवढी पापं

शेतकऱ्या तु तर
खुले आम कापला गेला
EVM च्या कोयत्यावर
कारण आता
विधानसभेत कोणीच
नाही तुझ्या बऱ्यावर
अरे
विरोधकच गेलाय
आता वाऱ्यावर

आज शहीद, हुतात्मे
सर्व रडले असतील
भारत माते समोर
खून केला तुम्ही
लोकशाहीचा
संविधाना समोर
- विलास खैरनार

प्रचार


तुमच्या प्रचारासाठी आलेल्या गाड्या
फक्त माझ्या गावाच्या बस स्टॅण्ड पर्यंतच येतील
पुढे तुम्हाला सार्वजनिक मुतारीच्या बाजूने
गटारीतून उडी घेत
शिवाजी चौकापर्यंत जावं लागेल,

नंतर तुम्हाला तुटलेल्या कवलांची
अन् पडलेल्या भिंतींची
जिल्हा परिषदेची शाळा दिसेल
शाळेतील फाटक्या कपड्यातील
कळकटलेले पोरं तुमच्याकडे पाहतील
त्या पोरांकडे बघून तुम्हाला किळसवाण वाटेल
पण तिथूनच तुम्हाला उकीरड्यातून नाक धरून
पुढे वस्तीत जावं लागेल

तिथे गेल्यावर आठ दहा पोरांचा घोळका
बसलेलला दिसेल
कोणाच्या हातात पत्ते,
कोणाच्या हातात बिडी तर दारूचा ग्लास ही असेल
तरी तुम्ही घाबरुन जाऊ नका
ते तुम्हाला गावाच्या विकासाबद्दल
अन् दुष्काळात तुम्ही आमच्यासाठी काय केलं?
कोणी काहीच विचारणार नाही
त्यांना तुम्ही तुमच्या जवळ असलेले
वांझोटे स्वप्ने दाखवा

त्याच वाट चुकलेल्या पोरांना
तुम्ही तुमची पुढची वाट विचारा
नाहीतर...
समोरच्या भिंतीवर "रोजगार हमी योजना"
अन् "मनरेगा" अस लिहिलेलं दिसेल
तिथूनच मोठ मोठे खड्डे असलेला रस्ता
तुम्हाला दुसऱ्या गावापर्यंत घेऊन जाईल.
तुमच्या प्रचारासाठी...
- विलास खैरनार

Saturday, November 9, 2024

भांडण

भांडण

आज जोराचे भांडण झाले
तिचं आणि माझं

प्रश्न अन् उत्तरांनी
तुफान राडा केला
वर्ष भराच्या रागाचा
वर्षाव तिथे झाला

शब्दाला शब्द भिणला
भावनांचा कल्लोळ झाला

भांडण फक्त तिच्यात
अन् माझं
तिसरं तिथे
कोणीच नव्हतं

भांडण मिटता मिटत नव्हतं
कारण फक्त भेटीच होतं

भांडण टोका पर्यंत आले
दूर होण्याचे विचार झाले
शेवटचे सर्व निर्णय
तिने माझ्यावर सोडले

मग मी ही स्वतः ला शांत केलं
थोडं भूतकाळात डोकवलं
अन् तिच्याकडे बघितलं

तिला जवळ घेतलं
तिचे अश्रू पुसत
तिला मिठीत घेतलं
अन्
दोघांनी एकमेकांना सॉरी म्हटलं

दोन तासापासून
सुरू असलेलं भांडण
एका सेंकदात मिटलं
- विलास खैरनार

Sunday, October 13, 2024

संवेदना

 


मनात पडलेला
भावनांचा सडा
कळत नकळत
मंतरलेल्या क्षणांची
संवेदनांच्या डोहात वलये
निर्माण करतात

मग वाटत
पकडावा शब्दांचा हात
जावं स्मृतीच्या घरट्यात
अन्
घ्यावा विसावा वेदनांसमवेत
- विलास खैरनार

तुला बरंच काही सांगायच होत


तुला बरंच काही सांगायच होत
पण नंतर आपली भेट झालीच नाही

मी आलो होतो तुझ्या लग्नाच्या मंडपात
अखेरच तुला भेटण्यासाठी
डोळे भरून बघण्यासाठी

पण तेव्हा तुझे डोळे पाणावलेले होते
म्हणून पाय माझे जागीच थांबले होते

डोळे माझे रडून सुकले होते
कारण तेही सुन्न झाले होते

मला खरंच तिथे यायचे नव्हते
तुझे सात फेरे मला बघायचे नव्हते

पण तुला दिलेलं वचन मला मोडायचे नव्हते
आणि तु दूर जाताना मला बघायचे नव्हते

तसाच काळजावर दगड ठेवून
दगडासारखा उभा होतो
अखेरच डोळे भरून तुला बघत होतो
- विलास खैरनार


क्षण

 

काही क्षणासाठी
मी तुझ्या ह्दयात
घर करुन जाईल

विसरणं अशक्य
अशा आठवणी
देऊन जाईल
- विलास

तु, पाऊस आणि कविता

 

तु, पाऊस आणि कविता
मला खूप आवडतात
तुझ्या प्रेमाचा रंग उधळतो
पावसाच्या धारा कोसळतात
कविता हृदयात बहरतात
तुम्ही तिघेही मला
आनंदाच्या सरीत भिजवतात
म्हणूनच...
तु, पाऊस आणि कविता
मला खूप आवडता

वाह...! पावसा


वाह...!
पावसा
तुझ्यावर
आज दिल
खूश झाला

आठवण
तिची आली
आणि
येऊन तु गेला
- विलास खैरनार

राजभाषा


महाराष्ट्र माझ्या देशा
मराठी माझी भाषा
इथे आहे संतांची खाण
सोबत मराठीचे ज्ञान

थोर साहित्यिकांनी दिली
लेखनाला नवी दिशा
गगनाला लाजवून टाकी
अशी आमची राजभाषा

खान्देश, विदर्भ, मराठवाडा
ऐक्याचे प्रतिक दाखवतो,
दिल्लीच्या तक्तावरी
मराठीची तोफा गर्जवितो

पु.ल. च्या हास्यात रंगला
शिरवाडकरांच्या काव्यात भिजला
व.पु. च्या कथेत रमला
अशा अनेकांनी राजभाषेचा
अभिमान वाढवला

आहे महाराष्ट्रावर
मराठी बोलीची माया
अशा माझ्या महाराष्ट्र
देशावर संतांची छाया
- विलास खैरनार
- ०६/०३/२०२२

वेदनांची कविता

 


ती म्हणाली
कविता लिहून दाखवं
मी फक्त ह्दयावर हात ठेवला
आणि दुःखावर वार केला
तेव्हा विस्फोट झाला
मनावर....
मग कविता अवतरली
कागदावर....
५/१२/२०२१

मनाले सुत

 

अशांत मन माझं
तुझ्यात रंगले
मनाले सुत जणू
इथेच जुळले

प्रेम करावे कसे
हे तर तुच शिकवले
बेचैन मनाचे तु
बंध कसे ग जोडले
४/१२/२०२१

ती आणि मी



तुझं दूर जाणं म्हणजे
हवेविना श्वास घेणं
कोंडलेल्या श्वासासोबत
लपाछपी खेळत बसणं

ध्येयापर्यंत पोहोचलो
तरी किना-यावर येणं
लाटांच रुपात
तुला शोधत बसणं

उसळून बघेल मी
प्रत्येक किना-यावर
सागराला सांगून ठेवलं
परत नाही येणार
ती भेटतं नाही तोवर
३/१२/२०२१

वळणाच्या वाटेवर




वळणाच्या वाटेवर
गाव माझं दिसलं
रस्त्यालगतच झुडपं
मला बघून हसलं

रानातलं पाखरु
जवळ माझ्या आलं
कानात येऊन
काहीतरी कुजबुजलं

जवळच्या दगडावर
माकड येऊन बसलं
गावाकडच्या गप्पा
उगीच रंगवत बसलं
- विलास खैरनार
१/१२/२०२१

ती म्हणजे कविता



कविता म्हणजे काय?
जेव्हा आपलं कोणी नसतं
तेव्हा आपलं दुःख सांगते
ती कविता !
जगण्याचा अर्थ सांगते
ती कविता !
भावनांची व्यथा मांडते
ती कविता!
स्वप्नाची दुनिया सुरु करते
ती कविता !
कल्पनेच्या तीरावर घेऊन जाते
ती म्हणजे कविताच !

सर्वत्र शुकशुकाट होता कारण... एक एक वोट फक्त एका बाटलीत विकला जात होता विकासाचे तेच तेच धडे मिरवत लोकशाहीला हिणवत होता गल्ली गल्लीत भंडारा ह...