Showing posts with label ललितलेख. Show all posts
Showing posts with label ललितलेख. Show all posts

Tuesday, July 28, 2026

गाव हरवत चाललंय... की माणूस?

- विलास खैरनार 

"गाव बदललंय" हे वाक्य आजकाल खूप सहज ऐकायला मिळतं. पण खरंच गाव बदललंय का? की गावाला गावपण देणारा माणूसच हरवत चाललाय?

पूर्वी गावात रस्ते कमी होते, पण माणसांमधले रस्ते खुले होते. आज डांबरी रस्ते झाले, पण मनांमधल्या वाटा कायमच्या बंद झाल्या. प्रत्येक घरावर सिमेंटचं छप्पर आलं, पण नात्यांवर मात्र स्वार्थाचं छप्पर चढलं.

आधुनिकतेच्या नावाखाली आपण विकासाच्या घोषणा करतो. उंच इमारती, चौपदरी रस्ते, इंटरनेट, मॉल, स्मार्टफोन यालाच विकास मानलं जातं. पण गावातल्या ओस पडलेल्या चावडीचा, शांत झालेल्या मंदिराच्या पाराचा, रिकाम्या विहिरीचा आणि बंद पडलेल्या शाळेचा हिशोब कोण मांडणार?

एकेकाळी गावात कुणा एकाच दुःख हे सगळ्या गावाचं दुःख असायचं. आज शेजाऱ्याचं नाव माहीत नसलेले लोक "सोशल" झालेत. मोबाईलमध्ये हजारो मित्र आहेत, पण संकटात खांद्याला खांदा लावून उभा राहणारा एकही माणूस नाही.

गावातून तरुण शहराकडे गेला, हे त्याचं स्वप्न होतं. पण त्याच्यासोबत गावाची उमेद, शेताची ताकद आणि संस्कृतीची मुळंही शहरात निघून गेली. मागे उरले वृद्ध आई-वडील, कुलूपबंद घरे आणि आठवणींवर जगणाऱ्या भिंती.

हा विकास आहे की विस्थापन?
ज्या मातीत जन्मलो, त्याच मातीत जगणं आज कमीपणाचं का वाटू लागलं? शेतात राबणारा बाप मागास समजला जातो आणि वातानुकूलित कार्यालयात बसणारा मुलगा यशस्वी ठरतो. श्रमाची किंमत कमी झाली आणि दिखाव्याची किंमत वाढली.

गावात आता सण होतात, पण उत्सव हरवलेत. जत्रा भरतात, पण मनं भेटत नाहीत. घरं मोठी झाली, पण कुटुंबं लहान झाली. पैसा वाढला, पण समाधान कमी झालं. आधुनिकतेने सुविधा दिल्या; पण माणुसकी हिरावून घेतली.

प्रश्न आधुनिकतेचा नाही. प्रश्न असा आहे की विकासाच्या नावाखाली आपण माणूसपण गहाण का ठेवलं? प्रगतीची व्याख्या जर फक्त सिमेंट, स्टील आणि मोबाईल नेटवर्कमध्ये अडकली, तर उद्या इतिहास लिहीला जाईल, गाव वाचलं होतं, पण गावपण मेलेलं होतं.

आज गरज आहे ती नव्या रस्त्यांची नाही; तर तुटलेल्या नात्यांना जोडणाऱ्या वाटांची. नव्या इमारतींची नाही; तर जुन्या विश्वासाची. नव्या यंत्रांची नाही; तर माणसाच्या मनात पुन्हा माणूस जागवण्याची.

कारण गाव कधीच घरांचा समूह नसून. गाव म्हणजे माणुसकीचा श्वास असतो. आणि जर तोच श्वास गुदमरला, तर गाव हरवत जाईल आणि माणूस सुद्धा.

Friday, June 26, 2026

गावाकडचा पाऊस

- विलास खैरनार 

पावसाळा हा केवळ एक ऋतू नाही; तो गावाकडच्या माणसाच्या आयुष्याचा श्वास आहे. शहरात पाऊस म्हणजे वाहतूक कोंडी, चिखल आणि छत्र्यांची गर्दी. पण गावात पाऊस म्हणजे नवजीवन, नव्या आशा आणि निसर्गाशी पुन्हा एकदा जुळून आलेलं नातं. प्रत्येक गावकऱ्याच्या मनात पावसाबद्दल एक वेगळी ओढ असते. माझ्याही मनात गावाकडच्या पावसाच्या असंख्य आठवणी आजही तितक्याच जिवंत आहेत.

पावसाळ्याची चाहूल लागते ती वैशाख- ज्येष्ठाच्या कडक उन्हानंतर. धरती तापलेली असते, झाडांची पानं करपलेली असतात आणि माणसाबरोबरच पक्षी, प्राणीही पावसाची आतुरतेने वाट पाहत असतात. मग एक दिवस अचानक आकाशात काळेभोर ढग जमू लागतात. दूरवर विजा चमकतात, गडगडाट होतो आणि थंडगार वाऱ्याची एक झुळूक अंगावर येते. त्या वाऱ्याबरोबर मातीचा सुगंध दरवळू लागतो. तो सुगंध इतका मोहक असतो की मन नकळत शेताकडे धाव घेतं.

पहिल्या पावसाच्या सरी जमिनीवर बरसू लागल्या की संपूर्ण परिसर जणू नव्याने जन्म घेतो. कोरडी पडलेली जमीन हिरवीगार होऊ लागते. डोंगरांवर हिरव्या गवताची चादर पसरते. झाडांच्या फांद्यांवर नवी पालवी फुटते. शिवारात सर्वत्र चैतन्य निर्माण होतं. शेतात उभं राहून पावसाच्या त्या थंडगार सरी अंगावर झेलण्याचा आनंद शब्दांत सांगता येणार नाही. कधी-कधी वाटायचं, या ओल्या मातीवर शांतपणे पडून राहावं, डोळे मिटावेत आणि निसर्गाचं संगीत ऐकत राहावं.

त्या शांततेत दूरवरून कोकिळेचा गोड आवाज कानावर पडायचा. झाडांवर बसलेले पक्षी आनंदाने किलबिल करायचे. शेतात बैलांच्या गळ्यातील घुंगरांचा मंजुळ नाद घुमायचा. पेरणीसुरू झालेली असायची. शेतकरी पावसात भिजत आपल्या कामात मग्न असायचे. कुणी नांगर चालवत असे, कुणी वखर फिरवत असे, तर कुणी बियाण्याची तयारी करत असे. त्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर थकवा असला तरी डोळ्यांत समाधान आणि आशा दिसायची. कारण हा पाऊसच त्यांच्या वर्षभराच्या उदरनिर्वाहाचा आधार असतो.

पाऊस थोडा थांबला की आमच्या मुलांच्या खेळांना सुरुवात व्हायची. आम्ही मित्रमंडळी गावाबाहेरच्या डोंगराकडे धावत सुटायचो. कोणत्या डोंगरावरून किती पाणी वाहत आहे, कोणत्या नाल्याला किती पाणी आलं आहे, कोणता ओढा भरून वाहतो आहे, हे पाहण्यातच आमचा आनंद असायचा. छोट्या-छोट्या धबधब्यांखाली उभं राहून भिजणं, पाण्यात उड्या मारणं, चिखलात खेळणं हे आमच्यासाठी मोठं साहस असायचं.

हे सगळं पाहून आम्ही आनंदाने गावात परतायचो आणि प्रत्येकाला सांगायचो, "अरे, अमक्या नाल्याला भरपूर पाणी आलंय!", "डोंगरावरून मोठा धबधबा वाहतोय!" आमच्या त्या बातम्या ऐकून गावातील मोठी माणसंही आनंदी व्हायची. त्या काळात मोबाईल नव्हते, सोशल मीडिया नव्हता; पण प्रत्येक आनंद प्रत्यक्ष भेटून वाटला जायचा.

गावाकडच्या पावसाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पावसाचा अंदाज. आज हवामान खात्याचे अहवाल, मोबाईल अॅप्स आणि उपग्रह आहेत. पण पूर्वी गावातील अनुभवी ज्येष्ठ माणसं निसर्गाची भाषा ओळखायची. संध्याकाळी गावातील मंदिराच्या ओट्यावर काही वयोवृद्ध मंडळी बसायची. त्यांची नजर सतत आकाशात फिरत असायची. ढगांचा रंग, त्यांची दिशा, वाऱ्याचा वेग, पक्ष्यांची हालचाल, वातावरणातील बदल या सगळ्यांचा अभ्यास करून ते सांगायचे, "आज रात्री पाऊस येईल", "हा ढग पुढे जाईल", "यंदा पाऊस चांगला पडेल" किंवा "अजून दोन दिवस थांबावं लागेल."

त्यांच्या अंदाजाचं आश्चर्य वाटायचं. अनेकदा त्यांचा अंदाज अक्षरशः खरा ठरायचा. मीही त्यांच्या जवळ जाऊन बसायचो. एकदा मी त्यांना विचारलं, "तुम्हाला एवढं सगळं कसं कळतं?" ते हसले आणि म्हणाले, "हे पुस्तकात शिकायचं नसतं रे. वर्षानुवर्षे निसर्ग पाहिला की तो स्वतः शिकवतो." मग त्यांनी रोहिणी नक्षत्र, मृग नक्षत्र, वाऱ्याच्या दिशा आणि ढगांच्या हालचालींबद्दल सांगायला सुरुवात केली. त्या वेळी त्यांचं बोलणं मला फारसं समजलं नाही; पण आज कळतं की तो त्यांच्या अनुभवाचा आणि निसर्ग निरीक्षणाचा खजिना होता.

पाऊस पडल्यावर लगेच शेतात पेरणी केली जात नसे. दोन-तीन दिवस जमिनीला पाणी मुरू दिलं जायचं. मग उन्हाची एक हलकी झाक पडली की जमिनीतून वाफ यायला लागायची. शेतकरी म्हणायचे, "आता वाफ आली." हाच पेरणीसाठी योग्य काळ असायचा. मग संपूर्ण गावात लगबग सुरू व्हायची. कुणी बैल सजवत असे, कुणी बियाण्याची पोती तयार करत असे, तर कुणी शेतीची अवजारे तपासत असे. पहाटेपासून संध्याकाळपर्यंत प्रत्येकजण शेतात काम करत असे. त्या दिवसांत गावातील प्रत्येक घर शेतीभोवतीच फिरत असे. पावसाळ्यात गावातील प्रत्येक सण, प्रत्येक आनंद अधिक खुलून दिसायचा. पावसात भिजून अंग थरथरत असताना आईच्या हातचा गरम चहा म्हणजे जणू स्वर्गीय आनंद वाटायचा.

आज काळ बदलला आहे. शेतीची साधनं बदलली, हवामानाचा अंदाज मोबाईलवर मिळतो, बैलांच्या जागी ट्रॅक्टर आले, गावातही आधुनिकता पोहोचली. पण गावाकडच्या पावसाचं सौंदर्य मात्र अजूनही तसंच आहे. पहिल्या पावसाचा मातीचा सुगंध, हिरवागार शिवार, धुक्याने झाकलेले डोंगर, पाण्याने भरलेले ओढे, पक्ष्यांचा किलबिलाट आणि निसर्गाचं ते निरागस रूप हे कधीच बदलणार नाही.

आज शहरात राहत असलो तरी पावसाचा पहिला थेंब पडला की मन नकळत गावाकडे धाव घेतं. डोळ्यांसमोर पुन्हा तेच हिरवे डोंगर उभे राहतात, बैलांच्या घुंगरांचा नाद ऐकू येतो, कोकिळेचा आवाज कानात घुमतो आणि ओल्या मातीचा सुगंध मन भरून टाकतो. तेव्हा जाणवतं की गावाकडचा पाऊस हा फक्त पाऊस नसतो; तो आपल्या बालपणाच्या आठवणींचा, मातीतल्या नात्याचा आणि आयुष्यभर जपून ठेवावासा वाटणाऱ्या भावविश्वाचा अमूल्य ठेवा असतो.

Tuesday, June 9, 2026

जनगणना : एक अस्मरणीय अनुभव

- विलास खैरनार

       नुकतेच आम्ही इयत्ता अकरावी आणि बारावीच्या वार्षिक परीक्षांच्या कामातून बाहेर पडलो होतो. पेपर तपासणी, विविध कमिट्या, मिटिंग्स आणि सततची धावपळ यामुळे शरीर थकून गेलं होतं; पण शिक्षकाचं आयुष्य हे थांबायला शिकवत नाही. अशातच एका दुपारी मोबाईलवर एक टेक्स्ट मेसेज आला, “भारतीय जनगणना २०२६-२७.”
       मेसेज वाचताच मनात एक वेगळीच भावना निर्माण झाली. देशाच्या एवढ्या मोठ्या आणि महत्त्वाच्या कामासाठी आपली निवड झाली, ही जाणीव अभिमानाने भरून टाकणारी होती.
         आमच्या महाविद्यालयातील कामात तत्पर, जबाबदार आणि होतकरू अशा बारा प्राध्यापकांची भारतीय जनगणना आयोगाने निवड केली होती आणि त्यात माझाही समावेश होता. सुरुवातीला हे काम साधंसोपं वाटत होतं; पण पुढचे काही दिवस आयुष्यातील वेगळे अनुभव देणारे ठरणार आहेत, याची कल्पना तेव्हा नव्हती.
     जनगणनेचं प्रशिक्षण सुरू झालं आणि त्याचसोबत उन्हाळ्याची तीव्रताही वाढू लागली. बाहेर तापमान चाळीस-पंचेचाळीस अंशांच्या घरात पोहोचलं होतं. प्रशिक्षण हॉलमध्ये पंखे होते; पण ते फक्त नावालाच फिरत होते. खरं तर आमच्यासोबत ते पंखेसुद्धा घामाघूम झाले होते. सगळे जण खिडकीजवळ जागा पकडण्यासाठी धडपड करत होते. मलाही वाटायचं की खिडकीत बसलं तर थोडा गारवा मिळेल; पण तिथून येणारी हवा म्हणजे जणू गरम भट्टीतून बाहेर पडणारी वाफ होती. ती थेट चेहऱ्यावर आदळायची आणि घाम आणखी वाढवायची.
       समोर प्रशिक्षण देणारे अधिकारी मात्र इतक्या जोशात जनगणनेचं महत्त्व सांगत होते की जणू आम्हाला थेट सीमारेषेवर पाठवणार होते. देशासाठी हे काम किती महत्त्वाचं आहे, प्रत्येक नागरिकाची माहिती देशाच्या विकासासाठी किती आवश्यक आहे, हे ते इतक्या आवेशाने सांगत होते की नकळत छाती अभिमानाने भरून आली.
इतक्यात महाविद्यालयातून फोन आला,
“अकरावीचा निकाल तयार करायचा आहे.”
आता खरी कसरत सुरू झाली. सकाळी नऊ ते संध्याकाळी पाचपर्यंत गरमीत प्रशिक्षण घ्यायचं आणि मग घरी जाऊन निकालाचं काम करायचं. दिवसभराच्या उकाड्याने शरीर थकून जायचं; पण जबाबदारी टाळणं शक्य नव्हतं. अशा कठीण परिस्थितीतून अखेर तीन दिवसांचं प्रशिक्षण पूर्ण झालं.

प्रशिक्षण संपलं आणि आता सुरू झालं जनगणनेचं खरं काम.

      आम्हाला दिलेल्या परिसराचा नकाशा तयार करायचा होता. प्रत्येक इमारतीला क्रमांक द्यायचा होता. सुरुवातीला हे काम थोडं तांत्रिक वाटलं; पण जसजसं काम पुढे जाऊ लागलं, तसं त्या परिसराशी आणि तिथल्या लोकांशी एक वेगळंच नातं तयार होऊ लागलं.
दररोज सकाळी ओळखपत्र, पाण्याची बाटली आणि डोक्यावर उन्हाचा तडाखा घेऊन आम्ही घराघरात फिरू लागलो. प्रत्येक घरात जाऊन लोकांची माहिती घ्यायची. प्रश्नांची यादी इतकी मोठी होती की काही वेळा मलाच वाटायचं “हे आपण जनगणना करतोय की मुलाखत घेतोय?”
“तुमच्या घरात किती लोक राहतात?”
“लग्न झालेले जोडपे किती?”
“तुम्ही रेडिओ ऐकता का?”
“टीव्ही पाहता का?”
“केबल आहे की डीटीएच?”
“नळाला पाणी येतं का?”
“सांडपाणी कुठे जातं?”
“बंद गटारात की उघड्यावर?”
“जास्त काय खाता - गहू की तांदूळ?”
असे तब्बल चौतीस प्रश्न विचारायचे होते.
पण खरी गंमत प्रश्न विचारण्यात नव्हती; तर समोरच्या व्यक्तीचा स्वभाव, हावभाव आणि प्रतिक्रिया समजून घेण्यात होती. एका घरासाठी किमान दहा मिनिटं लागत होती. त्यातली पाच मिनिटं तर फक्त दरवाजा उघडायला जात होती. मी बेल वाजवली की आतून मोठा आवाज यायचा 
“कोण आहे?”
मी उत्तर द्यायचो 
“जनगणना करायला आलो आहे.”
मग दरवाजा हळूच उघडायचा. सकाळची वेळ असेल तर काही जण डोळे चोळत, आळस देत बाहेर यायचे. काही लोक तर फक्त अंडरवेअरवरच दरवाज्यात उभे राहत होते. त्या क्षणी हसूही आवरायचं आणि कामही करायचं. मग मी मनातच म्हणायचो 
“आता याची गणना नेमकी कशी करायची?”

काही लोक अतिशय प्रेमाने बोलायचे. पाणी द्यायचे, खुर्ची द्यायचे. तर काही लोकांना संशय वाटायचा की आपण सरकारी अधिकारी नसून कदाचित काहीतरी वेगळंच काम करतोय.
एक कुटुंब तर थेट म्हणालं 
“आम्हाला जनगणना करायची नाही.”
त्यावेळी मलाही थोडा अधिकार दाखवावा लागला. मी शांतपणे म्हणालो 
“माहिती दिली नाही तर प्रकरण पोलिसांपर्यंत जाऊ शकतं.”
माझं वाक्य ऐकताच पूर्ण कुटुंब गंभीर झालं. मग त्यांनी अगदी नीटपणे सर्व प्रश्नांची उत्तरं दिली. त्या प्रसंगानंतर मला जाणवलं की सरकारी कामामध्ये संयमाइतकाच आत्मविश्वासही महत्त्वाचा असतो.

      एका घरी गेलो तर घरात एकच व्यक्ती होती आणि तीही दारू पिऊन गोंधळलेल्या अवस्थेत. आता त्याला भारतीय जनगणना आयोगाचे चौतीस तत्त्वनिष्ठ प्रश्न विचारायचे होते! तिथून कसाबसा पुढे गेलो तर एका बाईंनी मला पाहताच दरवाजा बंद केला. त्यांनी जणू मला एखादा “बोवा”च समजलं असावं.
मी खिशातून रुमाल काढला, घाम पुसला आणि जोरजोरात दरवाजा वाजवू लागलो 
“अहो मावशी… दरवाजा उघडा!”
इतक्यात पूर्ण कॉलनीच त्या घराजवळ जमा झाली. माझा हा तमाशा तब्बल अर्धा तास चालला; पण त्या मावशींनी काही दरवाजा उघडला नाही. शेवटी मी हार मानली आणि तिथून निघून गेलो.
        एक माणूस तर इतका संशयी होता की त्याने माझे फोटो काढले, तेही आयडी कार्डसह! जणू मी त्याच्या मालमत्तेवर कब्जा करायला आलो होतो.
त्या क्षणी हसू आवरत नव्हतं; पण त्याचवेळी लोकांच्या मनात सरकारी यंत्रणेबद्दल किती शंका आणि भीती असते, हेही लक्षात आलं.

        या सगळ्या प्रवासात अनेक प्रकारची माणसं भेटली. काही श्रीमंत, काही गरीब, काही शिक्षित, काही अशिक्षित; पण प्रत्येक घरामागे एक वेगळी कथा होती. कुठे वृद्ध आई-वडील एकटे राहत होते, कुठे लहान मुलांच्या गोंधळाने घर भरलेलं होतं, तर कुठे दोन वेळच्या भाकरीसाठी संघर्ष करणारी माणसं दिसत होती.
त्या ४५ डिग्री सेल्सिअस तापमानात फिरताना शरीर थकलं, चेहरा काळवंडला, पाय दुखले; पण मन मात्र अनुभवांनी समृद्ध झालं.
जनगणना हे फक्त आकडे मोजण्याचं काम नाही, तर देशातील माणसं, त्यांचं जगणं, त्यांचे प्रश्न आणि त्यांचं वास्तव जवळून पाहण्याची संधी आहे.
या कामाने मला संयम शिकवला, लोकांशी संवाद साधायला शिकवलं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक घरामागे एक संघर्ष दडलेला असतो, याची जाणीव करून दिली.
      आता काही प्रसंगांची आठवण आली की चेहऱ्यावर नकळत हसू येतं. उन्हाचा तडाखा, लोकांचे वेगवेगळे स्वभाव, घराघरातील अनुभव आणि त्या चौतीस प्रश्नांची अखंड मालिका, हे सगळं आयुष्यभर लक्षात राहणार आहे.
खरंच, जनगणना हे माझ्यासाठी फक्त सरकारी काम नव्हतं;
तो आयुष्य समजून घेण्याचा एक अस्मरणीय अनुभव होता.

Sunday, December 21, 2025

बस स्टँडवर उभा असलेला काळ

 - विलास खैरनार 

मी आज साक्री बस स्टँडवर शांत उभा होतो. डोळे रस्त्याकडे लागलेले, कानात वाहनांचा आवाज, हातात मोबाईल, आणि मनात एकच विचार,बस केव्हा येईल? घड्याळाकडे वारंवार पाहण्याची सवय लागली आहे. वेळेच्या काट्यावर आयुष्य मोजणारी ही आजची धावपळ, कुठे थांबू देत नाही. प्रत्येक मिनिट महत्त्वाचं झालं आहे. उशीर म्हणजे नुकसान, थांबणं म्हणजे वेळेची नासाडी, असं आजचं गणित झालं आहे. पण याच बस स्टँडवर उभा राहून, आज अचानक एक वेगळाच काळ आठवला.

तो एक काळ होता…

जेव्हा बस येण्याची घाईच नसायची. तेव्हा आम्ही तासंतास बसची वाट पाहायचो. बस उशिरा आली, रद्द झाली, दुसरी पकडावी लागली, काहीही झालं तरी ताण नव्हता, चिडचिड नव्हती. कारण तेव्हा वेळ आमच्यासोबत चालायचा. आज मात्र आपण वेळेमागे धावत आहोत, आणि तरीही तो गाठता येत नाही. कॉलेज सुटलं की थेट बस स्टँड. ते फक्त थांबायचं ठिकाण नव्हतं, ते आमचं दुसरं जग होतं. हातात दोन पुस्तकं, चेहऱ्यावर थकवा, पण डोळ्यांत उत्सुकता. कोण येईल, कोण नाही, आज कोणती चर्चा रंगेल याची आतुरता असायची. मित्र, मैत्रिणी, ओळखीचे चेहरे, कधी कधी एखादी अनोळखी पण हळूहळू आपली होणारी व्यक्ती. चहाच्या टपरीवरचा तो उकळता चहा, भेळीचा कागदी कोन, वडापावचा वास, आणि त्यासोबत न संपणाऱ्या गप्पा. कोणी भविष्याची स्वप्नं रंगवायचं,“आपण मोठं काहीतरी करूया,”कोणी सरकारी नोकरीची स्वप्नं पाहायचं, कोणी गाव सोडून जायचं स्वप्न पाहायचं, तर कोणी कुठेच न जाण्याचं. कोणी एखाद्या प्रेमकथेचा हळूच उल्लेख करायचं, नाव न घेता, पण सगळ्यांना कळेल अशा शब्दांत. कोणी शिक्षकांवर टीका करायचं,कोणी कॉलेजच्या व्यवस्थेवर, तर कोणी थेट संपूर्ण समाजावरच प्रश्नचिन्ह उभं करायचं.त्या गप्पांमध्ये ना मोबाईल होता, ना नोटिफिकेशनचा आवाज, ना कॉल कट झाल्याची घाई. फक्त हसणं होतं, ऐकणं होतं, आणि मनसोक्त जगणं होतं.

तेव्हा बस स्टँड म्हणजे फक्त प्रवासाचं ठिकाण नव्हतं. ते एक थांबलेलं आयुष्य होतं, जिथे वेळ थांबायचा, क्षण अनुभवले जायचे, आणि माणसं माणसांसोबत असायची. आज तोच बस स्टँड आहे. तोच रस्ता, तोच फलक, तीच चहाची टपरी. पण चेहरे बदललेत. आज प्रत्येकजण मोबाईलमध्ये गुंतलेला आहे. हेडफोन कानात, डोळे स्क्रीनवर, आणि मन कुठे तरी दूर. नात्यांची जागा हेडफोननी घेतली आहे, गप्पांची जागा स्क्रीनने, आणि भेटींची जागा “स्टेटस” आणि “रील्स”नी.

आज बस उशिरा झाली तर चिडचिड होते. तक्रार करावीशी वाटते.कोणाला तरी दोष द्यावासा वाटतो. कारण आज वेळ कमी आहे. आणि आठवणींसाठी वेळच उरलेला नाही. बस येते, मी चढतो, प्रवास सुरू होतो. पण मन मात्र मागेच राहून जातं, त्या काळात, त्या मित्रांमध्ये, त्या निष्काळजी, निर्मळ दिवसांमध्ये.

खरंच, तेव्हा बसची वाट पाहणं कंटाळवाणं नव्हतं.तो एक अनुभव होता. एक जगणं होतं. एक शिकवण होती, की आयुष्य म्हणजे फक्त पोहोचणं नाही, तर थांबणंही आहे. आज बस येण्याची वाट पाहतो, पण त्या काळाची बस कधीच येणार नाही… हे उमगूनही मन मात्र दरवेळी त्या जुन्या बस स्टँडवर थोडा वेळ थांबतंच. कारण काही जागा, काही क्षण, आणि काही माणसं, काळाच्या पुढे जात नाहीत, ती मनातच थांबलेली असतात, कायमची.




Friday, November 21, 2025

गावाकडचा प्रवास

- विलास खैरनार 

        गावाकडे जाणं म्हणजे केवळ प्रवास नसतो, तो आत्म्याच्या मुळांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग असतो. शहराच्या गोंगाटातून सुटका करून मी गावाकडे जायचं ठरवलं आणि एका सकाळी बॅग खांद्यावर टाकून बसस्थानकाच्या दिशेने निघालो. प्रवासात धावणारी झाडं, एकसारख्या लयीत चालणारी शेतं, अधूनमधून दिसणारी झोपडी, हे सगळं जणू माझ्या मनातल्या आठवणींची दारं उघडत होतं.

       बस गावात शिरताच मातीचा गंध जणू स्वागताला समोर उभा राहिला. छोट्या रस्त्यावरची कुत्र्यांची गडबड, दुकानासमोर उभ्या सायकली, आणि घराच्या ओट्यावर गप्पा मारणारे बाया, हे दृश्य इतकं ओळखीचं, इतकं आपल्यासारखं वाटलं की क्षणभर शहरातल्या धकाधकीबद्दल मनातल्या मनातच हसू आलं.

      घराच्या अंगणात पाय ठेवताच चुलीचा मंद धूर आणि आईचा आवाज दोन्ही कानावर पडले. “आलास का रे?” त्या एका वाक्यात कित्येक दिवसांची ओढ, काळजी, प्रेम सगळं सामावलेलं होतं.

        दुसऱ्याच दिवशी मी शेताकडे निघालो. पहाटेचं थंडगार हवामान, पाखरांचे किलबिलाट, आणि पायाखाली साचलेली दवबिंदूची ओल, हे सगळं मनात एका वेगळ्या शांततेचं वस्त्र उलगडत होतं.

      शेतात पाय ठेवल्यावर मातीचा राप माझ्या पायांना चिकटला, जणू म्हणत होता “तू कुठेही जा, पण माझ्यापासून दूर नाही.”
कडधान्याच्या शेतात मंद वारा डोलत होता. दूरवर बैलांच्या घंट्यांचा आवाज येत होता.
मी नांगराच्या मागे चालणाऱ्या काकांच्या गप्पा ऐकत काही काळ शांत उभा राहिलो. त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवताना म्हटलं,
“शहरातलं आयुष्य मोठं झालं रे, पण सुख अजून ह्या मातीच्या ओलितचं आहे.”
त्या वाक्यानं मनात कुठेतरी दरवाजा दणकन उघडला.

        शेतातून परतताना अचानक मनात आलं—“चल, डोंगरावर जाऊया…”
बालपणी ज्या डोंगरावर मी, माझी मित्र धावतफिरत, गोट्या खेळत भटकत असायचो, त्याच डोंगराचं शिखर आज पुन्हा मला बोलवत होतं.

         मी तिथपर्यंत पायीच निघालो. डोंगराच्या पायथ्याशी पोहोचताच वेगळीच हवा सुरू झाली थंड, स्वच्छ आणि सुगंधी. प्रत्येक पायरीवर मला माझं जुनं रूप भेटत होतं.
ज्या झाडामागे लपून आम्ही “लपाछपी” खेळायचो ते अजूनही तिथे उभेच आहेत.
एकेक खडक, एकेक दगड जणू माझी वाट पाहत होते.

        शिखरावर पोहोचलो तेव्हा खाली सगळं गाव दिसत होतं, शेतं, ओढा, मंदिरे, लाल कौलांची घरं…
वाऱ्याच्या एका जोरदार झुळुकेत मनाला स्पष्ट जाणवलं “जीवन किती धावतंय, आणि आपण किती विसरत चाललोय…”
त्या उंचीवर काही क्षण स्वतःशीच बसून राहणं म्हणजे एक प्रकारची साधना होती.

      रात्री अंगणात खाट टाकून मी झोपायला गेलो.
आकाश भरलं होतं ताऱ्यांनी.
वाऱ्याचा मंद आवाज, आसपासचा अंधार, आणि त्या शांततेत येणाऱ्या मातीच्या गंधाने मनात एकच विचार पक्का झाला.
“या मातीशी नातं तुटत नाही… काहीही झालं तरी नाही.”

       त्या रात्री झोपताना मला जाणवलं, गावाकडा जाणं म्हणजे बाहेरचा प्रवास नव्हे, तो आतल्या प्रवासाचा आरंभ असतो.

Monday, June 30, 2025

गावाकडची माणसं


              - विलास खैरनार 


            गाव म्हणजे फक्त माती, शेती आणि झाडंझुडूपांचा तुकडा नव्हे… गाव म्हणजे जिवंत श्वास घेणारं एक असं नातं, ज्यात माणसं एकमेकांना न दिसणाऱ्या धाग्यांनी जोडलेली असतात. गाव म्हणजे स्मरणात विरघळणारा धूर, सकाळच्या ओल्या वाऱ्यात येणारा मातीचा सुगंध, आणि समाधान देणारा मानवी स्पर्श.

         गावाकडची माणसं हीच गावाची खरी ओळख. त्यांच्या जगण्यातला साधेपणा म्हणजे अलंकार, आणि त्यांच्या स्वभावातील गोडवा म्हणजे घराघरात जपलेली परंपरा. इथं कुणाचं दुःख एकट्याचं राहत नाही, आणि कुणाचा आनंदही फक्त त्यांचा राहत नाही. एखादा आजारी पडला की शेजारी आपसूक धावत येतात, कोणी काढा घेऊन, कोणी डॉक्टरकडे सोबत म्हणून, तर कोणी फक्त खांद्यावर हात ठेवून.

          गावात "आपलं" आणि "तुमचं" असं वेगळं काहीच नसतं. गावकरी एकमेकांत मिसळून गेलेले असतात. दिवाळी आली, लग्न आलं, शेतात काम वाढलं तर मदतीसाठी एकच हाक पुरेशी. "अरे येतो!" असं म्हणत अर्धं गाव हजर होतं. कोणाचं शेत कोणाचं घर हे जगणं एकमेकांत मिसळून गेलेलं असतं.

इथली बोली साधी, थेट आणि मनाला भिडणारी असते. गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर उन्हात काम करून आलेला काळसरपणा असतो, पण डोळ्यांत मात्र पाण्यासारखी पारदर्शक माणुसकी चमकत असते. शब्दांत गोडवा नसला तरी कृतीत प्रामाणिकपणा असतो. शहरात जिथे “काय काम?” म्हणून विचारावं लागतं, तिथं गावात कुणाचं काम विचारायची गरजच नसते, सगळ्यांना आपोआप कळतं.

गावातली म्हातारी मंडळी म्हणजे अनुभवांची जत्रा. त्यांच्या गोष्टींच्या झोळीत इतिहास, परंपरा आणि जीवनाचं शहाणपण असतं. मंदिराच्या ओट्यावर, वडाच्या झाडाखाली किंवा दिवसा उन्हातून सुटकेसाठी ओटीवर बसून सांगितलेल्या जुन्या आठवणी त्यात एक वेगळीच ऊब असते. त्या कथांनी पिढ्या घडतात. आणि गावातली पोरं? त्यांच्या जगण्यात स्क्रीनपेक्षा जास्त रंग असतात. पावसात चिखलात लोळण घेणं, काठ्या-कुटक्या घेऊन खेळणं, झाडावर चढून कावळ्याची अंडी शोधण त्यांच्याकडे प्रत्येक क्षणात एक वेगळी उर्मी असते. मोकळं आभाळ, हिरवं रान आणि धावणारा वारा हेच त्यांचे खेळाचे साथी.

           गावातील बायका म्हणजे घर, रान आणि जगण्याचा आधारस्तंभ. सकाळचा चुलीवरच्या चहा  पासून ते संध्याकाळच्या जनावरांच्या देखभालीपर्यंत त्यांचं काम अविरत चालत राहतं. अंगण झाडणं, रानात पेरणी करणे, घरात लोणची घालणं कामाला शेवट नसतो. पण तरी त्यांच्या चेहऱ्यावर एका विचित्र समाधानाची हसू असतं, जणू जगण्याला त्यांनी मिठी मारली आहे.

गावातले सण, गावातल्या परंपरा शहरातील कृत्रिम प्रकाशात दिसत नाही अशी साधी-सरळ चमक यात असते. पोळ्यांच्या वेळी पोळ्या काढणं, शेतात गोंधळ, बैलजोडीला लावलेली तुरेवारी, भोंडल्यातील गाणी गावाचं आयुष्य ऋतुंसारखं तालबद्ध चालत राहतं.

      शहराच्या झगमगाटात आज जिथे माणुसकी हरवत चालली आहे, तिथं गाव अजूनही माणुसकीचा दिवा पेटवून बसलेलं असतं. इथल्या माणसांच्या आवाजात प्रामाणिकपणा आहे, त्यांच्या मनात मोकळेपणा आहे.
      गावाकडची माणसं म्हणजे खरी भारताची शान, साधी, सरळ, सच्ची आणि जिवाला भिडणारी. त्यांच्या जगण्यातली ओल, त्यांच्या नात्यांमधला उबदारपणा आणि त्यांच्या साधेपणातला सौंदर्य हेच खरं भारताचा आत्मा आहे.


Friday, December 17, 2021

विचार जिवंत पाहीजे


       जीवन जगताना आपण आपल्याच माणसांपासून दूर जातो, का ? कशासाठी? आजच्या धकाधकीच्या काळात माणूस माणूसपण विसरला आहे, किंबहूना माणूसकीच सोंग घेऊन माणूसपण दाखवतं आहे. 
       तरीही जीवन जगताना काही भूतकाळातील चांगल्या गोष्टी विसरून चालणार नाही कारण काही वेळेस भूतकाळाचं भविष्यकाळ घडवण्याचे धडे देतं असतो, जसा इतिहास वाचून छाती गर्वाने फुगून येते अगदी तसच वर्तमान सुध्दा अभिमानाने जगलो पाहीजे. 
           समाज बांधिलकीच्या माध्यमातून विचार केला तर माणूस अजून ही समाजाच्या चौकटीत अडकलाय, जोपर्यंत ही चौकट तुटत नाही किंवा नाहीशी होतं नाही तोपर्यंत सर्वधर्म समभावाच्या गोष्टी करणं निरर्थक आहे, वाईट व गंजलेल्या विचारांचा नाश झाला पाहीजे, नाहीतर हेच विचार देशाला घातक ठरू शकता. आधी माणूस जागा झाला पाहीजे तेव्हाच क्रांती घडेल, पण तरीही माणूस क्रांतिकारी म्हणून जन्माला येत नाही त्याला क्रांतीकारी बनवं लागतं त्यासाठी योग्य वेळी योग्य पाऊल उचलणं गरजेचं आहे.
     कोणती संस्कृती जपतो आहोत आम्ही, आजही दाभोलकर, पानसरे अशा अनेक विचारवंतांच्या भर रस्त्यावर हत्या होता, मारेकरी फक्त व्यक्तींची हत्या करू शकता त्यांनी लोकांपर्यंत पोहोचवालेल्या विचारांची नाही, इतिहास साक्षी आहे आम्ही समाज सुधारकांना जगू दिले नाही आणि नंतर त्यांच्या विचारांशिवाय आम्ही जगू शकत नाही, स्वतःच्या डोळ्यांनी स्वतःचीच प्रेत यात्रा बघणारे आगरकरांना आम्ही कसं विसरू शकतो, आम्ही फक्त महासत्ता होण्याचे स्वप्न बघतो पण महासत्ता होण्यासाठी आम्ही करतो तरी काय ? नुसतं बोलून काही होणार नाही तर ते कृतीमध्ये आणणं गरजेचं आहे. त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज व अशा अनेक विचारवंतांच्या विचारांची प्रेरणा घेतली पाहिजे तर आणि तरच आपण जगाच्या पाठीवर आपली ओळख ठामपणे करू शकतो.
                                        -विलास खैरनार 

   

Tuesday, October 20, 2020

गावाकडची माणसं

          आयुष्यभर काबाडकष्ट करून जीव शिणलेला. सारी हयात माळावर घालवल्याने त्वचा रापून गेलेली. ऊन पावसाच्या खेळाने डोळे खोल गेलेल्या विहिरीसारखे. गालावर सुरकुत्यांचे मखमली जाळे. कपाळावर थिजलेला आठ्यांचा गंध जोडीला अष्टगंध नाहीतर बुक्का. नांगर हाकून कमरेला आलेला बाक. नेसूचे जुनाट धोतर अन वर पांढरी छाटी नाहीतर सदरा. कपडे नेहमीच जुने पण स्वच्छ. डोईवर पांढरी टोपी. पायातल्या झिझलेल्या वहाणा दरिद्रीनारायणाची साथ सोबत दर्शवणारया अशाच. डोळ्यांवरचा चष्मा किमान दोन तीन ठिकाणी तरी जोडलेला वा दोरीने बांधलेला. गळ्यात तुळशीची माळ अन कंबरेला करदोडा हीच काय ती संपत्ती. हातात काठी अन ओठावर अनेक अनुच्चारित प्रश्न ! 

बैलाच्या खांद्याला झालेले दुखणे असो वा पांडुरंगाने ताणून धरलेला पाऊस! ह्यांची सोसायची तयारी…. आताच्या पिढीतल्या शेतकरयासारखे आत्महत्या करणारे हे नव्हेत. ओसरीत झोपायला लागते म्हणून कधी तक्रार नाही की शेतात अजूनही दारे धरायला लागतात म्हणून कंबर दुखते असे देखील म्हणणार नाहीत.

देवळात पांडुरंगासमोर तन्मयतेने वीणा धरून उभे राहतील अन घरी आल्यावर नातवाला घेऊन गावभर अभिमानाने मिरवतील. ताटात सुन काय वाढते अन कसे वाढते याचा चकार उल्लेख कधीही बाहेर करणार नाहीत. दात अजुन शाबूत; शिवारातल्या जुंधळ्याची गोड भाकरी जोडीला कोरड्यास संगतीला लालबुंद कांद्याच्या दोनचार पाकळ्या- लसणाच्या दोन तीन चण्या हेच अमृत जेवण. कोरभर भाकरी खाऊन रांजणातल्या पाण्याचा गोड घोट अन नंतर घडीभरची विश्रांती. मग पारावरच्या गप्पा.

एखादा बोलत असतो बाकीचे ऐकणार. गप्पांचे विषय अगदी साधे. माती अन नाती. ओलेते डोळे हळूच धोतराच्या सोग्याने कुणालाही कळणार नाही अशा पद्धतीने पुसतील. डोळ्यात पाणी का आले कधी वाच्यता करणार नाहीत.

मोबाईल, कॉम्प्यूटर, सोशल मिडीया, सिनियर सेकंड होम, लाफ्टर क्लब, मॉर्निंग वॉक, रेफ्रेशमेंट योगा, ध्यानधारणा असल्या कोणत्याही सोंगाची त्याना गरज नाही. स्वतःचे आयुष्य हेच तत्वज्ञान असल्याने कोणत्या साधू महाराज वा रिलीजीयस गुरूची तिळमात्र निकड नाही. दुःखाच्या सागरात राहून सुखाच्या गुरुकिल्लीवर ते अलगद तरंगत असतात. दुःखाच्या भवसागरात त्यांचे डोळे ओले होतील पण ते स्वतः ओले होत नाहीत की बुडूनही जात नाहीत.

म्हणूनच ही माणसं आयुष्यावरची चालती बोलती पुस्तके असतात. गावतल्या कुशीत आनंदाने जन्माला येऊन शिवारातल्या मातीत हसतमुखाने प्राण सोडतात. ना बीपी ना डायबेटीस न कोलेस्टेरॉल. नैसर्गिक जीवन अन नैसर्गिक मृत्यू. सुख दुखाच्या साध्या व्याख्या. जुजबी अपेक्षा अन माफक आवडी निवडी. कष्टालां नकार नाही अन सत्याला फाटा नाही. मायबाप हे कुलदैवत अन पांडुरंग हा देव. जत्रा हा उत्सव अन वारी हे उधाण! आनंद झाला तरी बेभान होणार नाहीत अन दुख झाले म्हणून गुडघ्यात मुंडके खुपसून बसणार नाहीत. नांगर अन टाळ मृदंग हेच काय ते ध्येय!

खूप हेवा वाटतो अशा लोकांचा. अशी माणसे पाहिली की डोळे नकळत भरून येतात अन काळजात कोलाहल होतो..!!