फक्त माझ्या गावाच्या बस स्टॅण्ड पर्यंतच येतील
पुढे तुम्हाला सार्वजनिक मुतारीच्या बाजूने
गटारीतून उडी घेत
शिवाजी चौकापर्यंत जावं लागेल,
नंतर तुम्हाला तुटलेल्या कवलांची
अन् पडलेल्या भिंतींची
जिल्हा परिषदेची शाळा दिसेल
शाळेतील फाटक्या कपड्यातील
कळकटलेले पोरं तुमच्याकडे पाहतील
त्या पोरांकडे बघून तुम्हाला किळसवाण वाटेल
पण तिथूनच तुम्हाला उकीरड्यातून नाक धरून
पुढे वस्तीत जावं लागेल
तिथे गेल्यावर आठ दहा पोरांचा घोळका
बसलेलला दिसेल
कोणाच्या हातात पत्ते,
कोणाच्या हातात बिडी तर दारूचा ग्लास ही असेल
तरी तुम्ही घाबरुन जाऊ नका
ते तुम्हाला गावाच्या विकासाबद्दल
अन् दुष्काळात तुम्ही आमच्यासाठी काय केलं?
कोणी काहीच विचारणार नाही
त्यांना तुम्ही तुमच्या जवळ असलेले
वांझोटे स्वप्ने दाखवा
त्याच वाट चुकलेल्या पोरांना
तुम्ही तुमची पुढची वाट विचारा
नाहीतर...
समोरच्या भिंतीवर "रोजगार हमी योजना"
अन् "मनरेगा" अस लिहिलेलं दिसेल
तिथूनच मोठ मोठे खड्डे असलेला रस्ता
तुम्हाला दुसऱ्या गावापर्यंत घेऊन जाईल.
तुमच्या प्रचारासाठी...
- विलास खैरनार
No comments:
Post a Comment