सोमवार, ३० जून, २०२५

गावाकडची माणसं


              - विलास खैरनार 


            गाव म्हणजे फक्त माती, शेती आणि झाडंझुडूपांचा तुकडा नव्हे… गाव म्हणजे जिवंत श्वास घेणारं एक असं नातं, ज्यात माणसं एकमेकांना न दिसणाऱ्या धाग्यांनी जोडलेली असतात. गाव म्हणजे स्मरणात विरघळणारा धूर, सकाळच्या ओल्या वाऱ्यात येणारा मातीचा सुगंध, आणि समाधान देणारा मानवी स्पर्श.

         गावाकडची माणसं हीच गावाची खरी ओळख. त्यांच्या जगण्यातला साधेपणा म्हणजे अलंकार, आणि त्यांच्या स्वभावातील गोडवा म्हणजे घराघरात जपलेली परंपरा. इथं कुणाचं दुःख एकट्याचं राहत नाही, आणि कुणाचा आनंदही फक्त त्यांचा राहत नाही. एखादा आजारी पडला की शेजारी आपसूक धावत येतात, कोणी काढा घेऊन, कोणी डॉक्टरकडे सोबत म्हणून, तर कोणी फक्त खांद्यावर हात ठेवून.

          गावात "आपलं" आणि "तुमचं" असं वेगळं काहीच नसतं. गावकरी एकमेकांत मिसळून गेलेले असतात. दिवाळी आली, लग्न आलं, शेतात काम वाढलं तर मदतीसाठी एकच हाक पुरेशी. "अरे येतो!" असं म्हणत अर्धं गाव हजर होतं. कोणाचं शेत कोणाचं घर हे जगणं एकमेकांत मिसळून गेलेलं असतं.

इथली बोली साधी, थेट आणि मनाला भिडणारी असते. गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर उन्हात काम करून आलेला काळसरपणा असतो, पण डोळ्यांत मात्र पाण्यासारखी पारदर्शक माणुसकी चमकत असते. शब्दांत गोडवा नसला तरी कृतीत प्रामाणिकपणा असतो. शहरात जिथे “काय काम?” म्हणून विचारावं लागतं, तिथं गावात कुणाचं काम विचारायची गरजच नसते, सगळ्यांना आपोआप कळतं.

गावातली म्हातारी मंडळी म्हणजे अनुभवांची जत्रा. त्यांच्या गोष्टींच्या झोळीत इतिहास, परंपरा आणि जीवनाचं शहाणपण असतं. मंदिराच्या ओट्यावर, वडाच्या झाडाखाली किंवा दिवसा उन्हातून सुटकेसाठी ओटीवर बसून सांगितलेल्या जुन्या आठवणी त्यात एक वेगळीच ऊब असते. त्या कथांनी पिढ्या घडतात. आणि गावातली पोरं? त्यांच्या जगण्यात स्क्रीनपेक्षा जास्त रंग असतात. पावसात चिखलात लोळण घेणं, काठ्या-कुटक्या घेऊन खेळणं, झाडावर चढून कावळ्याची अंडी शोधण त्यांच्याकडे प्रत्येक क्षणात एक वेगळी उर्मी असते. मोकळं आभाळ, हिरवं रान आणि धावणारा वारा हेच त्यांचे खेळाचे साथी.

           गावातील बायका म्हणजे घर, रान आणि जगण्याचा आधारस्तंभ. सकाळचा चुलीवरच्या चहा  पासून ते संध्याकाळच्या जनावरांच्या देखभालीपर्यंत त्यांचं काम अविरत चालत राहतं. अंगण झाडणं, रानात पेरणी करणे, घरात लोणची घालणं कामाला शेवट नसतो. पण तरी त्यांच्या चेहऱ्यावर एका विचित्र समाधानाची हसू असतं, जणू जगण्याला त्यांनी मिठी मारली आहे.

गावातले सण, गावातल्या परंपरा शहरातील कृत्रिम प्रकाशात दिसत नाही अशी साधी-सरळ चमक यात असते. पोळ्यांच्या वेळी पोळ्या काढणं, शेतात गोंधळ, बैलजोडीला लावलेली तुरेवारी, भोंडल्यातील गाणी गावाचं आयुष्य ऋतुंसारखं तालबद्ध चालत राहतं.

      शहराच्या झगमगाटात आज जिथे माणुसकी हरवत चालली आहे, तिथं गाव अजूनही माणुसकीचा दिवा पेटवून बसलेलं असतं. इथल्या माणसांच्या आवाजात प्रामाणिकपणा आहे, त्यांच्या मनात मोकळेपणा आहे.
      गावाकडची माणसं म्हणजे खरी भारताची शान, साधी, सरळ, सच्ची आणि जिवाला भिडणारी. त्यांच्या जगण्यातली ओल, त्यांच्या नात्यांमधला उबदारपणा आणि त्यांच्या साधेपणातला सौंदर्य हेच खरं भारताचा आत्मा आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा