रविवार, १६ नोव्हेंबर, २०२५

स्मशानभूमी

 

रात्रीचा गडद अंधार उतरला
आकाशातला चंद्रही थकला
एक थंड वाऱ्याची झुळूक आली
आणि माझा पाऊल स्मशानभूमीत पडला

जवळच एका कावळ्याने काव केला 
जणू तु मला सांगत होता 
"इथं सगळ्यांनी येऊन गप्प व्हायचं असतं,
आवाजही इथे अर्थ हरवतो..."

एका चितेचा धूर आकाशाला भिडला
त्यात कुणाचं आयुष्य धुरासारखं विरलं होतं 
जणू कुणाचं स्वप्नं जळत होतं
कुणाचं हास्य, कुणाचं बालपण
एकेक लाकडं जळताना मी बघत होतो

त्या राखेतून उठणाऱ्या वाऱ्याने
माझ्या चेहऱ्याला स्पर्श केला
अन् मला जाणवलं 
मृत्यूही किती शांत असतो
जीवनाच्या कोलाहलापेक्षा अधिक जिवंत असतो

स्मशानभूमी 
ही फक्त शेवटाची जागा नाही
ही सुरुवातीची जाणीव आहे
माणसाची शेवटी फक्त मातीच आहे

जिथे श्रीमंत-गरीब एकाच जागेवर येतात
जिथे अहंकार, पैसा, कीर्ती 
सगळं एकाच राखेत मिसळतात

त्या राखेखाली कित्येक कथा आहेत
कुणाचं अपूर्ण प्रेम
कुणाचं मोडलेलं आयुष्य
कुणाचं न सांगितलेलं सत्य

कधी कधी एखादा वाऱा वाहतो
तो जणू त्यांचाच श्वास असतो
जे अजून काही सांगू इच्छितात 
पण त्यांची भाषा आता राख झाली आहे

मी त्या रात्री बऱ्याच वेळ बसलो
त्या शांततेत
त्या राखेच्या सुगंधात
त्या मृत्यूसारख्या जिवंत क्षणात

आणि मला जाणवलं 
स्मशानभूमी भयाण नाही
ते सत्य आहे…
जीवंत माणसांसाठी 
ठेवलेला तो एक आरसा आहे

जिथे प्रत्येकाला दिसतं 
की आयुष्य किती क्षणभंगुर आहे
अन् प्रेमच एकमेव शाश्वत आहे

त्या राखेतून उठणाऱ्या धुरासारखं
मीही एक दिवस विरून जाणार
पण कदाचित कुणाच्या आठवणीत
थोडा जिवंत राहीन
जसं स्मशानभूमीत
धुरानंतरही उरतो तो वास 
शांततेचा, शेवटाचा, आणि सुरुवातीचा
                        - विलास खैरनार 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा