गुरुवार, २७ नोव्हेंबर, २०२५

ज्ञानोबा

ज्ञानोबा...
तु शब्दांचा महासागर असतांना 
निशब्द, निपचित जगलास,
तु समाजासाठी झिजलास,
अन् तरीही उपहासाचं लक्ष्य झालास.

तु लिहीत गेलास गीतेतील ओवी, 
अन् ठेवून गेलास ओठांवर ज्ञानेश्वरी

वारकरी अजूनही चालतो त्या ओवीच्या तालावर,  
पण जग मात्र पुन्हा अंधाराच्या कळसावर.
तु म्हणालास 
"सर्वांगी सुख होवो, परस्परें भावे भूतो..."  
पण आज, ज्ञानोबा, भाव मेला 
फक्त भावनांची बोली उरली,  
धर्माच्या नावाखाली मनं विखुरली.

तु सांगशील का, ज्ञानोबा,  
कसं पुन्हा शिकवू माणसाला माणूसपण?  
तुझ्या पसायदानातील प्रकाशाने ही काळोखी युगं उजळतील का पुन्हा?

तुच शिकवलंस  
भक्ती म्हणजे प्रेम,  
पण आता भक्ती झाली आहे व्यापाराचं निमित्त.
तुझ्या ओवीतला तो तेज आता विद्रोह मागतो,  

कारण मानवता आज पुन्हा तळमळते तुझ्या शब्दांसाठी, 
तुझ्या करुणेसाठी, अन् तुझ्या शांततेच्या आक्रोशासाठी.
                                         - विलास खैरनार 

मंगळवार, २५ नोव्हेंबर, २०२५

भारतीय संविधान आणि आजची परिस्थिती – एक विद्रोही हाक

- विलास खैरनार 

भारतीय संविधान लिहून झाले तेव्हा देशाचा व भवितव्याच्या डोळ्यांत आशेचा तेजोमय प्रकाश होता. समानता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या चार मशाली हातात घेऊन नव्या राष्ट्रानं प्रवास सुरू केला.
पण आज प्रश्न असा आहे, आपण त्या मशाली पेटवून ठेवतोय की त्यांच्या सावलीत अंधारच वाढवत आहोत?
संविधान म्हणतं “सर्वांना समान अधिकार” पण जमिनीवर अजूनही माणूस जातीवर मोजला जातो, धर्मावर तोलला जातो, पैशावर विकला जातो.
हा कोणता न्याय? हा कोणता विकास?

आजही एखादी मुलगी शिक्षणासाठी लढते, एखादा तरुण नोकरीसाठी धावतो, गरीब न्यायासाठी भटकतो…
आणि वरचे लोक संविधानाचे तख्त धारण करून फक्त भाषणं देत राहतात. संविधान समानता शिकवतं, समाज मात्र अजूनही भेदभावाच्या घाणेरड्या जाळ्यात गुदमरतो.
संविधानानं आवाज दिला, पण आज आवाज उठला की त्याला “देशद्रोही” असा शिक्का मिळतो. पत्रकारांनी प्रश्न विचारला तर त्यांच्या मागे नोटिसा धावतात. विद्यार्थी बोलले तर त्यांना आंदोलनात गुन्हेगार बनवलं जातं.
लेखक-कलावंत यांनी मत मांडले की त्यांच्यावर सोशल मीडिया तलवारी उगारतो. स्वातंत्र्य देणारं संविधान जिवंत आहे, पण आवाज दाबण्याची प्रवृत्ती त्याच्यावर धूळ टाकत आहे.

भारताचा आत्मा विविधतेत आहे. पण आज धर्मांच्या नावावर द्वेष पेरला जातो, भीती विकली जाते, आणि श्रद्धेच्या आडून सत्तेचा व्यापार केला जातो. धर्मनिरपेक्षता हे संविधानाचं शील आहे, पण आज तिचं अपहरण करून तिला राजकीय सभांमध्ये ढोल - ताशे फिरवले जातात.
धर्म जितका मोठा केला तितका माणूस लहान होत जातो आणि हाच विद्रोहाचा क्षण आहे. संविधानानं सत्ता मर्यादित ठेवली. पण आज सत्तेला मर्यादा नाहीत,
उलट लोकशाहीला मर्यादा लावल्या जातात. सत्तेत बसलेले लोक टीका ऐकू इच्छित नाहीत, विरोधकांना शत्रू मानतात, आणि प्रशासनाला स्वतःच्या हातातली बाहुली बनवतात. न्यायालय, माध्यम, संसद ज्या संस्थांनी लोकशाही सांभाळायची, त्यांना कमकुवत करण्याची स्पर्धा दिसते. संविधान संस्था मजबूत करायला सांगतं; सत्ता मात्र संस्थांना वाकवायला धडपडते. पण हा देश फक्त शासकांच्या हातात नाही, तो प्रत्येक नागरिकाच्या विवेकात आहे. तरीही आपणच लोकशाहीला जखमा देतो,
धोका कुणाकडूनच नव्हे, कधी कधी आपल्या शांततेतूनही वाढतो.

संविधान अजूनही शक्तिशाली आहे, पण त्याची अंमलबजावणी कमजोर. समाजात वाढणारा अन्याय,
राजकारणात वाढणारी दुटप्पीपणा, सत्तेच्या अहंकारात हरवलेली जबाबदारी, लोकांच्या विचारांवर वाढणारे ध्रुवीकरण हे सगळं या महान दस्तावेजाच्या पायावर घाव घालणारं आहे. विद्रोह म्हणजे हिंसा नाही, विद्रोह म्हणजे प्रश्न विचारणं, अन्यायाला “नाही” म्हणणं, संविधानातल्या मूल्यांना पुन्हा प्रज्वलित करणं. कारण शेवटी, संविधान जिवंत तेव्हाच राहील, जेव्हा आपण जागृत राहू.



सोमवार, २४ नोव्हेंबर, २०२५

कर्ण

कर्णा...!
तु नाही झालास देवांचा लाडका
तु जन्मलास चिखलातून,
पण तेज तुझं होतं आगीसारखं
अन् म्हणूनच जळत राहिलास आयुष्यभर.

गुरु द्रोणांनी सांगितलं
"तु क्षत्रिय नाहीस, मागे हट!"
पण तु म्हणालास
"धर्माचं कवच मी नाही घेतलं,
मी ते घडवलं माझ्या घामाने!"

कवच नव्हतं सोनेरी 
ते होतं श्रमाचं, अपमानाचं, अन्यायाचं!
तु घातलंस ते छातीवर,
अन् बाण रोवलेस
त्या समाजाच्या छातीत 
जिथं नाव पाहून न्याय दिला जातो!

कर्णा...!
तु युद्ध जिंकला नाहीस,
पण तु इतिहास हरवलास!
कारण विजेत्यांनी लिहिले ग्रंथ,
अन् तुझ्या रक्तानं त्यांनी ओढली ओळ 
“कि हा पराजित होता!”

पण आम्हाला ठाऊक आहे,
तु हरलाच नाहीस
तु उभा राहिलास प्रत्येक गरीबात,
प्रत्येक “असमान” मानल्या गेलेल्या माणसात!

कर्ण म्हणजे बंड 
जातिव्यवस्थेच्या काळजात घुसलेला बाण.
कर्ण म्हणजे आवाज 
“माझ्या जन्मावर नाही, कर्मावर मोज मला!”
कर्ण म्हणजे ठिणगी 
जी आजही जळते द्रोणाचार्यांच्या तिरस्कारांनी

अर्जुनाचे नाव देवांनी कोरलं,
पण तुझं नाव मातीने 
अन् म्हणूनच ते चिरंतन झालं!

कर्णा...!
तु देव नव्हतास,
तु माणूस होतास!
पण ज्या दिवशी माणूस देवावर उठेल,
त्या दिवशी जग कर्णाचं होईल.....!
                - विलास खैरनार 

शुक्रवार, २१ नोव्हेंबर, २०२५

गावाकडचा प्रवास

- विलास खैरनार 

        गावाकडे जाणं म्हणजे केवळ प्रवास नसतो, तो आत्म्याच्या मुळांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग असतो. शहराच्या गोंगाटातून सुटका करून मी गावाकडे जायचं ठरवलं आणि एका सकाळी बॅग खांद्यावर टाकून बसस्थानकाच्या दिशेने निघालो. प्रवासात धावणारी झाडं, एकसारख्या लयीत चालणारी शेतं, अधूनमधून दिसणारी झोपडी, हे सगळं जणू माझ्या मनातल्या आठवणींची दारं उघडत होतं.

       बस गावात शिरताच मातीचा गंध जणू स्वागताला समोर उभा राहिला. छोट्या रस्त्यावरची कुत्र्यांची गडबड, दुकानासमोर उभ्या सायकली, आणि घराच्या ओट्यावर गप्पा मारणारे बाया, हे दृश्य इतकं ओळखीचं, इतकं आपल्यासारखं वाटलं की क्षणभर शहरातल्या धकाधकीबद्दल मनातल्या मनातच हसू आलं.

      घराच्या अंगणात पाय ठेवताच चुलीचा मंद धूर आणि आईचा आवाज दोन्ही कानावर पडले. “आलास का रे?” त्या एका वाक्यात कित्येक दिवसांची ओढ, काळजी, प्रेम सगळं सामावलेलं होतं.

        दुसऱ्याच दिवशी मी शेताकडे निघालो. पहाटेचं थंडगार हवामान, पाखरांचे किलबिलाट, आणि पायाखाली साचलेली दवबिंदूची ओल, हे सगळं मनात एका वेगळ्या शांततेचं वस्त्र उलगडत होतं.

      शेतात पाय ठेवल्यावर मातीचा राप माझ्या पायांना चिकटला, जणू म्हणत होता “तू कुठेही जा, पण माझ्यापासून दूर नाही.”
कडधान्याच्या शेतात मंद वारा डोलत होता. दूरवर बैलांच्या घंट्यांचा आवाज येत होता.
मी नांगराच्या मागे चालणाऱ्या काकांच्या गप्पा ऐकत काही काळ शांत उभा राहिलो. त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवताना म्हटलं,
“शहरातलं आयुष्य मोठं झालं रे, पण सुख अजून ह्या मातीच्या ओलितचं आहे.”
त्या वाक्यानं मनात कुठेतरी दरवाजा दणकन उघडला.

        शेतातून परतताना अचानक मनात आलं—“चल, डोंगरावर जाऊया…”
बालपणी ज्या डोंगरावर मी, माझी मित्र धावतफिरत, गोट्या खेळत भटकत असायचो, त्याच डोंगराचं शिखर आज पुन्हा मला बोलवत होतं.

         मी तिथपर्यंत पायीच निघालो. डोंगराच्या पायथ्याशी पोहोचताच वेगळीच हवा सुरू झाली थंड, स्वच्छ आणि सुगंधी. प्रत्येक पायरीवर मला माझं जुनं रूप भेटत होतं.
ज्या झाडामागे लपून आम्ही “लपाछपी” खेळायचो ते अजूनही तिथे उभेच आहेत.
एकेक खडक, एकेक दगड जणू माझी वाट पाहत होते.

        शिखरावर पोहोचलो तेव्हा खाली सगळं गाव दिसत होतं, शेतं, ओढा, मंदिरे, लाल कौलांची घरं…
वाऱ्याच्या एका जोरदार झुळुकेत मनाला स्पष्ट जाणवलं “जीवन किती धावतंय, आणि आपण किती विसरत चाललोय…”
त्या उंचीवर काही क्षण स्वतःशीच बसून राहणं म्हणजे एक प्रकारची साधना होती.

      रात्री अंगणात खाट टाकून मी झोपायला गेलो.
आकाश भरलं होतं ताऱ्यांनी.
वाऱ्याचा मंद आवाज, आसपासचा अंधार, आणि त्या शांततेत येणाऱ्या मातीच्या गंधाने मनात एकच विचार पक्का झाला.
“या मातीशी नातं तुटत नाही… काहीही झालं तरी नाही.”

       त्या रात्री झोपताना मला जाणवलं, गावाकडा जाणं म्हणजे बाहेरचा प्रवास नव्हे, तो आतल्या प्रवासाचा आरंभ असतो.

गुरुवार, २० नोव्हेंबर, २०२५

इंदुरीकरांच्या कीर्तनशैलीचा गाजावाजा आणि आज उभा राहिलेला आरसा

- विलास खैरनार 

इंदुरीकर महाराज लोकप्रिय झाले ते त्यांच्या नवीन पद्धतीच्या कीर्तनशैलीमुळे. त्यांच्या अगोदरही अनेक कीर्तनकार झाले, पण अशा विनोदी भरलेल्या, जोरदार अभिनयाने सजलेल्या, कधी-कधी टोकाच्या टीकेने रंगलेल्या शैलीत कोणी बोलले नव्हते. ‘कॉमेडी कीर्तन’ हा शब्द कानावर पडायला लागला तो यांच्यामुळेच.पण त्यांच्या उपरोधिक टिप्पणींच्या धडाक्यात स्त्रियांविषयी अनेकदा कमीपणाची, हीन मानसिकतेची टीका ऐकू येत गेली, हेही तितकेच खरं. व्यसनाधीन युवकांवर त्यांनी झडर घातला, ते योग्यच; पण अनेक मुद्द्यांवर त्यांची विचारसरणी मध्ययुगीनच वाटत असे. असो, विषय तो नाही. प्रश्न आहे त्यांच्या अलीकडील निर्णयाचा आणि त्यामागच्या दिलेल्या कारणाचा. अचानक ते म्हणाले "आता मी कीर्तन करणार नाही, हे त्यांचे स्वातंत्र्य आहे, कीर्तन करावं की करू नये. पण लोकांना मी घोडे लावलेत!" ही भाषा? आणि ही पद्धत कितपत योग्य?

वर्षानुवर्षे ते कीर्तनात सांगत आले, मुलींनी गॉगल लावू नये, मेकअप नको, वराती मध्ये नाच नको, खर्चिक लग्नं करू नयेत, गाडी-घोड्यांची मिरवणूक नको, मेनू साधा असावा, उधळपट्टी टाळा, लोक त्यावर टाळ्या पिटत, हसत, दाद देत.पण त्यांच्या मुलीच्या साखरपुड्याला मात्र, मोठा दिमाख, स्टाईलिश एंट्री, गॉगल, मेकअप, नाच, समारंभात भरपूर खर्च, आणि सगळे तेच "थेर" ज्यावर ते स्वतः वर्षानुवर्षे टीका करत आले. त्यांच्या मुलीला सर्वांचे आशीर्वाद लाभावेत, हे साऱ्यांचंच मत आहे. पण तेच उपदेश करत राहणारे स्वतःला मात्र अपवाद समजून कसं चालणार?

ते सांगत होते की, वऱ्हाडी जमिनीवर बसले,वाढपी वारकरी पोशाखात, महिला पारंपरिक वेशात त्यांचे हे मुद्दे छानच आहेत पण यापेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे महत्त्वाच्या मुद्द्यांवर त्यांनी केलेले उपदेश त्यांनीच पाळले की नाही? त्यांनीच सांगितलं होतं “जेवण साधं असावं! एक लापशी, आमटी-भात पुरेसा!” पण त्यांच्या कार्यक्रमात? यादी पाहिली की त्यांचेच भाषण आठवतं. ज्यावर त्यांनी कडाडून टीका केली. 

लोकांवर उपदेश करणाऱ्यांचे आचरण अधिक कसोशीने तपासले जाते हेच इंदुरीकर महाराज विसरले. लोकांना चार गोष्टी सुनावणारा माणूस जेव्हा स्वतःच उलट वागतो, तेव्हा प्रतिक्रिया येणारच. लोकांनी चूक दाखवली म्हणून त्यांच्यावर तेच नाराजी, त्रागा आणि "घोडे लावलेत!" अस बोलतात. ही भाषा आणि हा पवित्रा कीर्तनकारांना शोभणारा नाही. उपदेश करणारा स्वतः पाळत नसला तर त्याचा उपदेश तोंडाची वाफ ठरतो आणि हेच आज दिसलं. उपदेश एक आणि वर्तन दुसरे असेल तर तो दांभिकपणा ठरतो. संत परंपरेच्या नावाने बोलणाऱ्यांनी हे लक्षात घ्यायला नको का?

कीर्तन ही परंपरा म्हणजे फक्त विनोद, टिंगल, टाळ्या नव्हे, ती संस्कृती, प्रबोधन, विचार आणि नैतिकतेची साधना आहे.
“कीर्तन तेथेच, जिथे हिताचा संदेश असतो
आणि जिथे कीर्तन करावं तेथे अन्नाचा मोह नसावा" 
असे तुकाराम महाराज म्हणतात. ही मापदंडे आजचे सर्व कीर्तनकार पाळतात का? हा प्रश्न स्वतःलाच विचारण्याची वेळ आली आहे.

इंदुरीकर महाराज जे काही होते आणि आजच्या परिस्थितीत तफावत दिसते म्हणूनच लोकांनी त्यांना आरसा दाखवला. हे स्वीकारणं कठीण जरी वाटलं तरी तेच योग्य आहे. प्रसिद्ध व्यक्ती कितीही मोठी असली तरी उपदेश करताना आणि आचरणात तफावत असेल तर समाज माफ करत नाही.