जीवाभावाचा
पण एक सवय
त्याच्या जीवावर भारी
तो दारूच्या ग्लासात
स्वतःला शोधतो
अन् मी त्यातला
हरवलेला माणूस शोधतो
प्रत्येक संध्याकाळ येते
निवांत, न सांगता
बसतो आम्ही सोबत
मी बोलतो स्वप्नांशी
तो मात्र बुडतो दारूशी
डोळे त्याचे ओले
दारूपेक्षा खोल वेदनेनं
कधी हसत सांगतो
कधी थांबतो अचानक
जणू जगच अचानक
त्याच्या श्वासात अडकल्यासारखं
मी धरतो त्याचा हात
नेतो त्याला प्रकाशाकडे
तो हसतो
“तुला कळणार नाही रे कधी,”
असं हलकंसं म्हणत
त्याला वाईट म्हणावं
तरी मन धजावत नाही
कारण त्याच्या पाठी
अधुरी, न उच्चारलेली
एक खोल कथा आहे दडलेली
तो मला वाटतो
फाटलेल्या स्वप्नासारखा
अन् मी त्याला
त्याच्या हरवलेल्या
आवाजाचा शेवटचा प्रतिध्वनी
कदाचित
मी त्याच्यासाठी केवळ एक ओळ आहे
पण तो माझ्यासाठी एक अपूर्ण,
जिवंत कविता
- विलास खैरनार
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा