Saturday, March 12, 2022

राडा प्रेमाचा


        "मी जे काही सांगतोय,  ते खरंच सांगतोय यात खोटं अजिबात नाही" 
        शाळेत असतानांच मला पिक्चर बघण्याची खूप आवड होती, तेव्हा पिक्चर मध्ये त्या हिरोची एकच हिरोईन असायची आता किती असता माहीती नाही तो ज्याचा त्याचा आवडीचा विषय आहे. असो... पण सहाजिकच पिक्चर बघून आपली पण एक हिरोईन असावी असं मला वाटायचं, 
          मी एकदा तिच्यावर इंप्रेशन पाडण्यासाठी शाळेत चेह-यावर खूप पावडर फासून गेलो, पण चेह-यावर किती पावडर लावायची याचा अंदाज मला आला नव्हता, पावडर लावून आल्यामुळे सरांनी कुत्र्या सारखा धुतला, सरांना माझ्या पावडर लावण्या मागच्या भावना समजल्याच नव्हत्या आणि माझ्या प्रेमाचा सुगंध तिच्यापर्यंत पोहोचलाच नव्हता.
         अभ्यासात पुढे पुढे असणारा मी केव्हा मागे मागे गेलो समजलंच नाही तेही तिच्यामुळे. असो, आता आमची दहावी संपली होती म्हणजे तिची आणि माझी. 
         पुढे काॅलेजला आम्ही जाऊ लागलो, हाफ पॅट वरुन मी सरळ फुल पॅटवर काॅलेजला जाऊ लागलो. तसा तीचा आणि माझा काॅलेजचा पहिलाच दिवस होता, जीन्स आणि टी शर्ट घालणा-या मुली मी फक्त टीव्हीवर बघितल्या होत्या  पण आता प्रत्यक्षात बघत होतो.
         वर्गात आता एका पेक्षा एक सुंदर मुली दिसत होत्या, मनात वाटत होतं पहीली सोडून आता दुसरीवर लाईन मारावी, मी तशी एक सुंदर मुलगी शोधली आणि तिथे लाईन टाकण्यास सुरुवात केली, दुस-या दिवशी तिचा भाऊ आला,  तिला काॅलेजला सोडायला, त्याची मोठी मोठी दाढी, बोटांमध्ये मोठ्या मोठ्या अंगठ्या, जसा काही तो अफजल खान सारखा दिसत होता, मी बिचारा अमीर खान सारखा, दोन हात करण्याची वेळ आली तर कुठं निभाव लागणार, मग मी पण कोणाच्या बापाला न घाबरता तिचा चॅप्टर तिथेच क्लोज केला.
          मग मी तिसरी शोधली, तिथे तर कहाणी सुरू होण्याच्या आधीच संपली, कारण तिचा बाप त्या काॅलेजचा प्राध्यापक होता, आता प्राध्यापकाच्या पोरीला पटवणं म्हणजे थोडं जिगरीच होतं, तसही त्याचा जावई होणं मला आवडलं नाही म्हणून मी सरळ तिला बहीण मानलं, आता तुम्ही असं नका म्हणू की मी तिच्या बापाला घाबरलो, तसं अजिबात नाही, सांगितलेलं बरं...
           बरेच दिवसानंतर काय झालं,  एका दिवशी बसमध्ये एक मुलगी दिसली, मी ठरवून घेतलं आता मागे हटायचं नाही, काहीही झालं तरी हिला पटवायचचं, रोज तिच्यावर शायनिंग मारुन मारुन कस बस अखेर तिला मी पटवलं, आता रोज बस मध्ये आमचं ये-जा असायची,  कधी ती माझं सीट सांभाळायची कधी मी तिचं सीट सांभाळायचो, रोज बस मध्ये एका सीटवर बसायचं आणि गप्पा करत बसायचं, कधी तिने जोरात हसायचं कधी मी जोरात हसायचं, आता काॅलेजमध्ये पण आम्ही सोबत राहायला लागलो. बघता बघता आमची प्रेम कहाणी तिच्या गावाच्या पोराण पर्यंत गेली, मग काॅलेजला येणा-या तिच्या गावाच्या पोरांनी मला गाठले आणि मला म्हणाले याच्या पुढे जर तु तिच्या सोबत दिसला तर तुझं काॅलेजला येणं-जाणं आम्ही बंद करुन टाकू, त्यांनी मला हे सरळ शब्दात सांगितलं, मी पण अहिंसाचा पुजारी होतो, धमकी आणि मारपीठ आपल्या तत्वात बसतं नव्हतं म्हणून मी तिचाही चॅप्टर क्लोज केला.
        आता जुन्या लोकांची म्हण आहे,  "जुणं ते सोनं"  मग काय करणार मी माझ्या जुन्या प्रेमाकडे वळलो, आणि तिचा शोध घ्यायला सुरुवात केली, कारण काहीही झालं तरी ते माझं पहिलं प्रेम होतं आता कोणी आपल्या पहिल्या प्रेमाला कसं विसरेल बरं, ती बरेच दिवसापासून काॅलेजला दिसली नव्हती, पण काय करणार मन हे वेडं असतं, या वेड्या मनाला तरी कसं समजवायचं.
         आता मला थोडी हिम्मत पण येऊन गेली होती. म्हणतात ना अनुभवातून माणूस बरेच गोष्टी शकतं असतो अगदी तसंच माझं झालं असावं असं आपण समजू, कोणत्या तरी महान विचारवंताने  कुठंतरी म्हणून ठेवलं आहे की, "छोकरी,बस और ट्रेन के पीछे कभी नही भागना चाहीये"  पण तरीही मी मागे हटत नव्हतो, यावेळी मी मात्र अतीच केली, थेट मी तिच्या भावाजवळ गेलो आणि विचारलं, "काय रे, तुझी दिदी सध्या कुठं काही दिसतं नाही" त्यांने माझ्याकडे बघितलं, मला वाटलं आता इथे पण काहीतरी राडा होणार, पण झालं उलटंच, त्यांने माझ्याकडे बघितलं आणि थोडं हसून घेतलं, "काय झालं हसायला" मी विचारलं, त्यांने माझ्या खांद्यावर हात ठेवून म्हटलं,"माझ्या दिदीच लग्न होऊन सहा महिने झाले" हे शब्द कानावर ऐकताच जणू काही माझ्यावर आकाश कोसळले होते. तेव्हा मी स्वतःला कसंबसं सावरलं, सरळ घरी गेलो आणि पिक्चर बघत बसलो.
        असो, जे झालं ते, आता मी सर्व काही सोडून एक सभ्य माणूस झालो आहे, उगीच कोणाचा गैरसमज नको, आता माझ्या सारखा चांगला माणूस तुम्हाला शोधून सापडणार नाही, तसा तुम्ही शोधण्याचा प्रयत्न ही करु नका, सांगितलेलं बरं.
                                           - विलास खैरनार 

No comments:

Post a Comment

  मनात पडलेला भावनांचा सडा कळत नकळत मंतरलेल्या क्षणांची संवेदनांच्या डोहात वलये निर्माण करतात मग वाटत पकडावा शब्दांचा हात जावं स्मृतीच्या घर...