Tuesday, October 8, 2024

बाप कधीच हसला नाही


गुंठा गुंठा जमीन विकून बाप बँकेचे हप्ते भरत होता
आणि कर्जाचे दुःख दारूच्या बाटलीत टाकत होता

मायेच्या लुगड्याचा ठिगळ तिच दुःख सांगत होता
नशेत पडलेला बाप जीवनाची व्यथा मांडत होता

दुष्काळ पडला तेव्हा बाप उभ्या उन्हात सुकला होता
मुलीच्या लग्नाचा कर्जाचा हप्ता बराच चुकला होता

बाप घामाने रक्त आटवत उभ्या पिकांना सहारा देत होता
कधीतरी येईल आपल्या पिकांना भाव म्हणून
निसर्गाशी डाव खेळत होता

माय अशीच निसर्गाशी डाव खेळता खेळता थकली
आणि कायमची आजारपणाला कवटाळून बसली

तेव्हापासून बापाच्या पाठीवर फक्त वेदनांचा बोझा होता
कोपऱ्यात बसून रडणारा बाप तो माझा होता

जीवनाचा डाव तो पावलो पावली हरला होता
उभ्या जिंदगीत बाप माझा कधीच हसला नव्हता

                          - विलास खैरनार 

No comments:

Post a Comment

सर्वत्र शुकशुकाट होता कारण... एक एक वोट फक्त एका बाटलीत विकला जात होता विकासाचे तेच तेच धडे मिरवत लोकशाहीला हिणवत होता गल्ली गल्लीत भंडारा ह...