Tuesday, October 8, 2024

हे विठ्ठला...!


हे विठ्ठला...!
तु जरा विटेवरुन खाली ये
अण् माझ्या गावाकडे चल
येतांना रुक्मिणीला एकांतात सोडून ये

मी तुला माझ्या शेताच्या बांधावर नेतो
आणि तुला त्या झाडावर लटकवतो
जिथे माझा बाप लटकला होताफास घेऊन

मग काही दिवसानंतर घरी जा
आणि रुक्मिणीला विचार
तुला एकांत कसा वाटला

मग वाटल्यास परत ये
येतांना रुक्मिणीला घेऊन ये
हंबरडा फोडण्यासाठी
मी माझ्या आईला आणतो
दुःखाचे सांत्वन करण्यासाठी

आणि हो...!
येतांना इंद्रायणीलाही आण
मी तिला दुष्काळग्रस्त भागातील,
शेतीत विहीरीच्या
तळाशी बुडवतो
तुकारामाच्या गाथ्यागत

मग विचार करून सांग विठ्ठला
तुला आमच्यासारख दु : खा सोबत
खेळता येईल का ?
आमचं जीवन जगणं तुला जमेल का ?

No comments:

Post a Comment

  मनात पडलेला भावनांचा सडा कळत नकळत मंतरलेल्या क्षणांची संवेदनांच्या डोहात वलये निर्माण करतात मग वाटत पकडावा शब्दांचा हात जावं स्मृतीच्या घर...