Sunday, October 6, 2024

पाऊस


पाऊस....
डोंगराच्या कुशीतून,कडेतून,
धबधब्याच्या रुपात पायथ्याशी येणारा,
नदी, नाल्यातून खळखळून वाहणारा,
तलाव, धरणाच्या साठ्यात तृप्त होऊन
शांतपणे माझ्या कडे पाहणारा,

पण पावसा.....!
सध्या तु कुठेच दिसत नाही,
डोंगरद-या, नदी नाले,
कुठे, कुठेच नाही,

आठवतं का तुला.....?
तु एकदा आला होतास,
केदारनाथाच्या दर्शनाला,
आणि कोशी नदीच्यापात्रात खेळायला,
तु आलास, तेही उग्र रूपात,
सारं जनजीवन विस्कळीत करून गेला,

असा कसा रे तु........!
कधी येतो, कधी येत नाही,
आला तर सर्व उद्ध्वस्त करून जातो,
नाही आला तर उजाड करून जातो,
कधी कधी.....
फक्त एकदा भेट देऊन गायब होतोस,
शेतकरी राजाच्या जीवाला घोर लावून जातोस,


"ये रे ये रे  पावसा, तुला देतो पैसा,"
"पैसा झाला खोटा, पाऊस आला मोठा,"
मी असं कधीच नाही म्हणणार,
अरे....!
आमच्या कडेच काही नाही तुला काय देणार,

पावसा.....!
तुझी नेमकी वेळ सांगून जा,
गारपीठ म्हणून नाही,
किंवा अवकाळी म्हणून नाही,
आता फक्त "पाऊस" म्हणून येऊन जा.

No comments:

Post a Comment

सर्वत्र शुकशुकाट होता कारण... एक एक वोट फक्त एका बाटलीत विकला जात होता विकासाचे तेच तेच धडे मिरवत लोकशाहीला हिणवत होता गल्ली गल्लीत भंडारा ह...