रविवार, १६ नोव्हेंबर, २०२५

तुझ्या लग्नाच्या दिवशी



तुझ्या लग्नाच्या दिवशी,
मी गावातच होतो
तु फुलांनी नटलेली होतीस,
अन् मी आठवणींत अडकलो होतो.

नाही आलो मी तुझ्या लग्नाच्या मंडपात,
पण मन मात्र तुझ्याच भवती फिरत होतं 
तुझ्या नजरें आड तुलाच बघतं होतं,

तुला हळद लागली तेव्हा  
तु सोन्यासारखी चमकत होती
पण त्या पिवळ्या रंगाखाली
दडलेली तुझी वेदना फक्त मलाच दिसत होती

नगाऱ्यांच्या आवाजात
माझं मन शांत झालं होतं 
सनईच्या सुरात
नाव माझं कुठे दिसतं नव्हतं.

हसत होते सर्व 
अन् तु शांतपणे रडत होती
डोळ्यांत येणारं पाणी 
तु हळुवार पुसत होती

सात फेरे घेताना, तुझा तोल गेला 
लोक म्हणाले " तु जरा घाबरलीस",
पण मला जाणवलं,
तू तेव्हा माझ्या आठवणीत अडकलीस

तेव्हाच....
तुझ्या पायातील पैजणांचा एक घुंगरू,
घसरत माझ्या पायांजवळ आला,
वाकून मी तो उचलला,
तेव्हा त्यावर दिसत होती
तुझ्या मेहंदीची हलकी छटा,
अन् सुगंध तुझ्या अंगाचा,
तुझ्या ओंजळीचा...

पण लगेच आठवलं,
तो तुझ्या नव्या आयुष्याचा होता...

मी तो शांतपणे मुठीत बंद केला 
अन् मागे सरकलो,
त्या नव्या वाटेवर
माझ्या प्रेमाला अर्पण करत होतो

आता मी जेव्हा जेव्हा गावात जातो,
अन् त्याच ठिकाणी उभा राहतो,
तुझ्या लग्नाचा तो दिवस
दरवर्षी पुन्हा पुन्हा आठवतो 
             - विलास खैरनार 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा